गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, या कामांना सुरुवातदेखील करण्यात आली आहे. या कामांमध्ये रस्ते, शाळा बांधकाम, अंगणवाडी बांधकामाचा समावेश आहे. ही कामे करीत असताना कामाची गुणवत्ता दर्जेदार असावी याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी. बांधकामाच्या दर्जाबाबत कुठलीही तडतोड केली जाणार नाही, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी दिला.
तालुक्यातील छिपिया येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ. अग्रवाल म्हणाले, बांधकामासंदर्भात गावकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल. या परिसरातील रस्त्यांची कामेसुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येतील. गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आ. अग्रवाल यांनी दिली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५० गावांतील शाळांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच छिपिया येथे २० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते व सुरक्षा भिंत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपसरपंच अनमोल उके, चेतनकुमार बहेकार, सुरेंद्र माहुरकर, भुयेंद्र भलावी, दुर्गा खोटेले, ममता खोब्रागडे, सरिता टेकाम, लक्ष्मी कठाणे व गावकरी उपस्थित होते.