सालेकसा : आदिवासी समाजाचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या कचारगड देवस्थानाच्या विकासासाठी कसलीही अडचण न येऊ देता केंद्र शासनाकडून पुरेसा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी शुक्रवारी (दि. २६) कचारगड येथे दिली.
कचारगड येथे यात्रा यंदा रद्द करण्यात आली तरी माघ पौर्णिमेनिमित्त महापूजा धार्मिक व पारंपरिक रितीरिवाजानुसार सुरू करण्यात आली. शुक्रवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते सप्तरंगी गोंडी ध्वज फडकावून आणि गोंडी आराध्य देवी-देवतांना नमन करून महापूजेची सुरुवात करण्यात आली. या वेळी खासदार अशोक नेते, माजी आमदार संजय पुराम, समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, सालेकसाचे नगराध्यक्ष वीरेंद्र उईके, आदिवासी मित्र शंकरलाल मडावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी कसलीही गर्दी करणारे आयोजन न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचे पालन करीत पूर्वजांचे नवस पूजन आणि महापूजेला येणाऱ्या आदिवासी भाविकांना भोजनदान करण्याचा शुभारंभ ना. फग्गनसिंह कुलस्ते यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष गुणवंत बिसेन, परसराम फुंडे, राजेंद्र बडोले, बाबा लिल्हारे, प्रतिभा परिहार, देवराम चुटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, धनेगाव ते कचारगड पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कोया पुनेमी महापूजनाचा कार्यक्रम शांततेच्या वातावरणात सुरू झाला आहे. तो येत्या १ मार्चपर्यंत चालणार असून, कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
.....
यात्रा स्थळी गर्दी नाही
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा कचारगड यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम पाळून केवळ धार्मिक विधी पार पाडले जात आहेत. आयोजन समितीसुद्धा नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत आहे. त्यामुळेच यंदा यात्रा स्थळी भाविकांनीसुद्धा गर्दी केली नाही.