विजेंद्र मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कखातीया : गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर पायलट प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याच्या चार महिनेच पायलट प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता या विमानतळावरून वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आता नियमित छोटी विमाने उडत असल्याचे दृश्य जिल्हावासीयांना पाहायला मिळणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे २००७ पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. मात्र पूर्वी बिरसी विमानतळावरून केवळ हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीतच प्रशिक्षण केंद्र सुरू राहत होते. हिवाळ्यात रायबरेली येथे धुक्याची समस्या राहत असल्याने पायलटला प्रशिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळेच या कालावधीत बिरसी येथील विमानतळावर प्रशिक्षण दिले जात होते. मात्र या वर्षीपासून आता बिरसी विमानतळावरूनच वर्षभर पायलटला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षक पायलट प्रशिक्षण केंद्राचे संचालक कृष्णेंदु गुप्ता यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
२०० पेक्षा अधिक पायलटने घेतले प्रशिक्षण
- बिरसी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अकॅडमी रायबरेलीचे पायलट प्रशिक्षण केंद्र असून आतापर्यंत या पायलट प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत २०० हून अधिक पायलट झाले आहे. पायलटला प्रशिक्षण देण्यासाठी येथे सहा लहान प्रशिक्षक विमान उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे अल्पावधीत हे पायलट प्रशिक्षण केंद्र देशात सर्वत्र नावारुपास आले आले आहे. यासाठी बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक विनय ताम्रकार व अधिकारी सुध्दा सहकार्य करीत आहे.