डेल्टा प्लसच्या अनुषंगाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित रुग्णांपैकी २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नियमित पाठविले जातात. जून महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे २० कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. यापैकी १ रुग्ण सडक अर्जुनी आणि १ रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे. अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागला. अहवाल येईपर्यंत हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन रुग्णांचा अहवाल डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वच नागरिकांचे नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने या दोन्ही गावांत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.
..........
दोन्ही रुग्णांची हिस्ट्री तपासणार
डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, त्यांच्या प्रवासाचा संदर्भ याची माहिती घेऊन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचेसुद्धा नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
.......
एका रुग्णामागे शंभर जणांचे नमुने टेस्ट करणार
काेरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शंभर जणांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर वाढविण्यावरसुद्धा भर देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
...........
काेट
कोरोनापेक्षा डेल्टा प्लसचा संसर्गाचा वेग अधिक आहे. सध्या जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुग्ण ॲक्टिव्ह नाही. मात्र यानंतरही नागरिकांना पूर्वीइतकी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे आहे.
- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया