‘जन्मदात्याचे छत्र हरपले : दहा हजार नगदी, महिन्याकाठी १ हजाराची नियमित मदत लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : सांसरिक जीवन जगत असताना मनुष्य आपल्या कौटुंबीक मायाजाळात पूर्णत: गुंतला जातो. आपल्या सीमित परिवाराच्या सुख-दु:खाच्या पलीकडे सर्वत्र अंधकारमय दृश्य दिसते, हा निसर्ग नियमाचा नितीनेम म्हणावा लागेल. त्यात मानवी स्वभावाला दोष देणे संयुक्तीक वाटणार नाही. हल्लीच्या समाज जीवनात असे चित्र दिसत असले तरी आजही समाजामध्ये आपल्या घराचे ऐश्वर्य त्यागून परामर्थ साधण्याची तत्परता दाखविणारे काही मोजके महानुभाव वावरताना दिसून येतात. याचा प्रत्यय गुरुवारी (दि.२५) निमगाव येथे तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथील सेवाभावी दानशूर शिशुपाल सुखराम पटले यांच्या उदारमतवादी कायप्रणालीवरुन दिसून आले. खडकी (डोंगरगाव) या लांब अंतरावरून ‘लोकमत’मधील बातमी वाचून शिशुपाल पटले स्वत: त्या चार अनाथ बहिणींच्या सांत्वना भेटीसाठी निमगाव येथे आले. आल्याआल्याच त्या चार लेकींना त्यांनी मायबापाच्या ममतेने कवटाळले. मोठ्या आस्थेने त्यांची विचारपूस केली. त्यांचा ममतारूपी हात त्या अनाथ चार बहिणींना आपल्या जन्मदात्या बापासारख्या त्याक्षणी वाटत होता. आपल्या कुटुंबाची यशस्वी जबाबदारी सांभाळणारे प्रगतीशील शेतकरी असलेले व खडकी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिशुपाल पटले सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडण्यासाठी तसेच गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी रात्रंदिन अग्रेसर राहून वंचितांना आर्थिक मदतीसह पाठबळ देण्यासाठी नियमित तत्पर असल्याचे त्यांच्या या दानशूर प्रणालीवरुन दिसून येत आहे. मायबापाचे छत्र हरपलेल्या त्या मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी ते देवदूतसारखे धावून आले. त्या बहिणींसाठी आपल्या मुलींप्रमाणे फराळसुद्धा आणूण आपल्या सामाजिक दायित्व निभविले. त्यांनी त्या मुलींना नगदी १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. चार बहिणींच्या चरितार्थासाठी दर महिन्याला एक हजार रुपये मोठी मुलगी मोहिनी हिच्या बचत खात्यावर नियमित पाठविण्याचे वचन त्यांनी उपस्थितांसमोर दिले. यावेळी निमगावचे तंमुस अध्यक्ष माधोराव गायकवाड, पोलीस पाटील संजय कापगते, सेवाभावी शिशुपाल पटले यांचे सहकारी हितेंद्र जांभुळकर, एस.के. खोब्रागडे, केवीद बोपचे, समन क्षीरसागर, सुदाम सूर्यवंशी, बबन सूर्यवंशी उपस्थित होते. लोकमतच्या बातमीने केले प्रवृत्त निमगाव येथील मानवी मनाला चटका देणारी, हृदय हेलावून सोडणारी बातमी दैनिक लोकमतने प्रकाशित केली. त्यात ‘त्या अनाथ लेकींना नाथाची गरज’ असून त्या अनाथ बहिणींच्या मदतीसाठी सामाजिक कार्यातील दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. अनाथ झालेल्या चार मुलींची कथा लोकमतमधून वाचायला मिळाल्याने आपले पाय निमगावच्या दिशेने वळल्याचे शिशुपाल पटले यांनी ग्रामस्थांसमोर सांगितले. त्यामुळे आज आपण आर्थिक मदत देण्यासाठी आल्याचे सदर प्रतिनिधीजवळ सांगितले.