गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कागदपत्राच्या होत असलेल्या कटकटीमुळे अनेक लोक तर तक्रार करायलाच पुढे येत नाहीत. मोठे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधीक आहे. मोठे मोबाईल हातात ठेवता येत नाही व खिशातही मावत नाहीत. अशा मोबाईलला बसण्याच्या ठिकाणी बाजूला मांडल्यावर तो मोबाईल विसरतो परिणामी चोरीला जातो. जिल्ह्यात ८ तालुके असून १६ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतल्यास मोबाईल चोरी किंवा मोबाईल हरविण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. परंतु दररोज कमीत कमी ८ मोबाईल गायब होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबाईल हरवितात किंवा चोरीला जात आहेत. परंतु अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मोबाईल खरेदी केल्यावर महिने-दोन महिने मोबाईलचे बिल सांभाळून ठेवले जाते. परंतु अधिक काळ झाल्यावर बिलही सांभाळले जात नाही. अशा स्थितीत मोबाईल चोरीला गेला किंवा हरविला तर मोबाईलचे बिल आणल्याशिवाय पोलीस तक्रारच घेत नाही. त्यामुळे अनेक लोक मोबाईल चोरीला गेले तरी तक्रार करायला पुढे येत नाहीत.
...............................
मोबाईल चोरीच्या घटना
२०१९- १०२
२०२०-९९
२०२१- ४४
..........................
चोरी नव्हे, गहाळ म्हणा
- एखाद्याचा मोबाईल चोरीला गेला आणि तो व्यक्ती तक्रार करायला गेला तर चोरी झाली म्हटल्यावर पोलीस तक्रार घेतच नाहीत.
- मोबाईल हरविला किंवा गहाळ झाला म्हटल्यावर पोलीस त्याची नाेंद घेतात. परंतु मोबाईल चोरीला गेल्यावर म्हणताच पोलीस तक्रारकर्त्यालाच प्रश्न विचारून हैरान करून साेडतात.
- मोबाईल चोरीला गेला तर चोरणाऱ्याचे नाव सांगा, तुम्हीच हरविला असेल आणि चोरी झाल्याची खोटी तक्रार देता असे म्हटले जाते.
- आपला वेळ पोलीस ठाण्यातच जाऊ नये यासाठी चोरी झालेला मोबाईल गहाळ झाला असे सांगून अनेकजण मोकळे होतात.
........................
या भागात मोबाईल सांभाळा
- गोंदिया शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी येथे मोबाईल सांभाळणे आवश्यक आहे.
- मरारटोली बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.या ठिकाणी मोबाईल सांभाळण्याची गरज आहे.
- केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल पळवून नेत असतात.