गोंदिया : दुकानातून सामान व पैसे चोरून नेणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सन २०१६चे हे प्रकरण असून यामध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी सोमवारी (दि.७) आपला निर्णय सुनावला. आरोपीचे नाव खन्ना राजकुमार कुमार (२७, रा. दसखोली) असे आहे.
सविस्तर असे की, ३ नोव्हेंबर २०१६ रोजी फिर्यादी नरेश आसनदास भक्तानी (रा. सिंधी कॉलनी) यांच्या लोहा लाइनमधील किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून खन्ना कुमार व योगेश गोविंद उगेमुगे (३०, रा. मरघट रोड) यांनी होम थिएटर, काजू, बदाम, बारीक सुपारी, खारीक तसेच एक, दोन व पाच रुपयांचे सिक्के असा एकूण सहा हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंद केला होता. या दोघांना अटक पोलिसांनी माल हस्तगत केला होता व सबळ साक्षपुरावे गोळा करून दोषारोपपत्र सादर करून खटला चालविण्यात आला.
या खटल्याचे सुनावणीत आरोपी योगेश उगेमुगे यास न्यायालयाने यापूर्वीच शिक्षा ठोठावली आहे. तर खन्ना कुमार याच्यावर दोषसिध्द झाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी त्याला ५ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. विशेष म्हणजे, खन्ना कुमारवर शहर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांनी केला असून युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता मुकेश बोरीकर यांनी केला. न्यायालयीन कामकाज हवालदार ओमराज जामकाटे व शिपाई किरसान यांनी पाहिले.