महिलांमध्ये दहशत : पांढरीत एका लाखाची घरफोडी लोकमत न्यूज नेटवर्क पांढरी : मागील काही दिवसांपासून एकावर एक घटना घडत आहेत. पांढरी परिसरात चोरांची टोळी सक्रिय असल्याची माहिती आहे. पेट्रोल-डिझेल चोरीपासून ते घरफोडी पर्यंतच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिलांसह पुरूषांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. पोलीसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिड महिन्यापूर्वी पांढरी येथील विलास पारधी यांच्या घरी दीड लाखांची घरफोडी झाली होती. १५ जूनच्या रात्री हलबीटोला-पांढरी येथील निला सुनील ढोरे (४५) बाहेर गावी गेल्या असताना चोरांनी त्यांच्या घराचा मागील दार तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरून ३५ हजार रूपये रोख, ५० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिणे, १५ हजार रूपये किमतीचे चांदीचे दागिणे, सिक्के व इतर साहित्यावर चोरांनी हात मारला. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वसाहतींची दारे फोडून तेथील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. मूरपार-राम येथील गावकऱ्यांनी चोराचा डाव हाणून पाडला. त्यांना पकडण्यासाठी पाठलाग केला असता ते जंगलाच्या दिशेने पळून गेले. चोरांना पकडण्यासाठी तंटामुक्त समित्यांचे ग्राम सुरक्षा दल काहीच काम करीत नाही. पोलीस विभागाची रात्र गस्तसुद्धा परिसरात मर्यादितच असल्यामुळे चोरांना संधी मिळत आहे. येथे वास्तव्यास असलेल्या महिला कर्मचारी व गावकरी महिलांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस विभागाने नियमित रात्रीची गस्त वाढवून चोरांना पकडावे, अशी मागणी होत आहे.
चोरांची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:12 AM