गोंदिया : सराफा दुकानाचे शटर तोडून आतून ३ लाख ५० हजार ६६२ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख लंपास करण्यात आली. ही घटना सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत आमगाव खुर्द येथे शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री घडली.
फिर्यादी कोमल मेघराज जैन (४७, रा. आमगाव खुर्द) हे पत्नी व मुलासोबत रायपूर येथे लग्न कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांचे मोठे भाऊ व परिवारातील इतर सदस्य होते. तरीही अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बरडिया ज्वेलर्स या दुकानाचे शटर सब्बल व लोखंडी रॉडने तोडून आतून वेगवेगळ्या रॅकमधील वेगवेगळ्या ट्रेमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये किमतीचे तीन किलो चांदीचे दागिने, ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २० हजार रुपये किमतीचे बेनटेक्सचे दागिने, काउंटरमध्ये ठेवलेले रोख २२ हजार रुपये तसेच दुकानालगत मागील खोलीच्या दाराच्या कडीला एका कापडी थैल्यात दुकानातील खरेदी-विक्रीचे रोख ८२ हजार ६६२ रुपये असा एकूण तीन लाख ५९ हजार ६६२ रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम ४५७, ३८०, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी सालेकसा येथील न्यू कॉलनीतील रहिवासी भगीरथ पटले यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या प्रवीण झंझाड व सोनू अग्रवाल यांच्या घरीही चोरी केली.
दुकान फोडताना सीसीटीव्हीत दिसले तिघे
जैन यांच्या दुकानाचे शटर तोडताना सीसीटीव्हमध्ये तिघे जण दिसून आले. तर झंझाड व अग्रवाल यांच्या घरीही तिघांनीच चोरी केली आहे. यामुळे आता यादृष्टीने पोलिस काय पाऊल उचलतात याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. तपास पोलिस निरीक्षक बुराडे करीत आहेत.