गोंदिया : शहरातील बाजपेई चौकात रविवारी (दि.४) सायंकाळी ५ वाजता दरम्यान विजय मार्केटिंगचा कारखाना असलेल्या इमारतीत थिनरच्या डबकीत स्फोट घडला आहे. या स्फोटात सहा जण जखमी झाले असून यातील एकाला नागपूरला हलविण्यात आले आहे. प्रकरणी शेजारी राहणारे इब्राहीम अहमद खाँ पठाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय मार्केटींगच्या मालकावर गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश इंद्रकुमार गोलानी विजय मार्केटिंग या नावाने फर्निचरचा कारखाना आहे. कारखाना असलेल्या इमारतीच्या चौथ्या माळ््यावर विक्की लिल्हारे (रा. नागरा), नागू मदनलाल पताहे (रा. चांदणीटोला), मंतोष नावाचा इसम (रा. नवेगाव), केतन ढोडरे (रा. सिरपूर) व मोरेश्वर गयगये (रा. घिवारी) हे सर्व विटा जुडाईचे काम होते. यावेळी त्यांना भिंतीजवळ ठेवलेली एक निळ्या रंगाची २० ते २५ लिटर थिनर द्रव्याने भरलेली डबकी दिसली व त्यांनी डबकीला उचलून दुसरीकडे ठेवले. मात्र काही वेळातच त्या डबकीचा स्फोट झाला. या स्फोटात विक्की लिल्हारे गंभीर जखमी झाला व त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर नानू पताहे व मंतोष यांना किरकोळ जखमा झाल्या. या स्फोटाची तिव्रता एवढी होती की छतावरील भिंतीला भगदाळ पडून इमारतीच्या पश्चिमेस भिंतीकडे असलेला मुलगा खाली सिमेंट शिट फोडून खाली पडला. यात घरात टीव्ही पाहत असलेल्या इब्रहिम खॉ अहमद खॉ पठान (७०), रूबिन परवीन (२४), शबिना परवीन (२२, सर्व रा. वाजपैयी वॉर्ड) यांनाही किरकोळ मार लागला. या कारखान्यात कुलरची बॉडी बनविण्याचे काम होत असून त्यासाठी वापरण्यात येणारे थिनर कोणत्याही प्रकारची काळजी न घेता असुरक्षितरित्या ठेवल्याने हा स्फोट झाला. इब्राहिमखॉ पठान यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंद केला. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)विक्कीवर नागपुरात उपचार सुरू ४तपासी अधिकारी सपोनी बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात डबकीच्या जवळच असलेला विक्की लिल्हारे हा सर्वात जास्त जखमी झाला आहे. यामुळे त्याला लगेच नागपूरला हलविण्यात आले असून त्यावर उपचार सुरू आहेत. तर कारखान्याचे मालक गोलानी यांच्याक डे दुकानाचा परवाना असल्याचेही त्यांनी सांगीतले. मात्र या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
थिनरच्या डबकीमुळे घडला ‘तो’ स्फोट
By admin | Published: October 06, 2015 2:17 AM