गोंदिया : मूर्री रेल्वे चौकी येथील येरणे बार येथे २६ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता तिघांनी बार मालकाला मारहाण करून त्याच्या काऊंटरमधील १९ हजार रूपये रोख व दारूच्या चार बाटल्या हिसकावून नेल्या होत्या. या प्रकरणात तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपी संदीप लक्ष्मीकांत चौधरी (२४) रा. गौतमनगर गोंदिया याला १८ मार्चच्या रात्री ९ वाजता अटक करण्यात आली.
या पूर्वी आरोपी आशुतोष उर्फ आशु रजनिकांत डोंगरे (२१) व पंकज पन्नालाल खोब्रागडे (१८) दोन्ही रा. गौतमनगर गोंदिया या दोघांना अटक करण्यात आली होती. मूर्री येथील येरणे बारमध्ये काऊंटरवर २७ फेब्रुवारी रोजी कुणाल हेमंत येरणे हा असताना तिन्ही आरोपींनी कुणालला दारू पाज असे म्हटल्यावर त्यांना दारू पाजण्यास कुणालने नकार दिला होता. त्यावर पंकज खोब्रागडे याने त्यांच्या काऊंटरमधील गल्यातून १९ हजार काढले. दोन बॉटल मॅकडॉल नंबर १ व व्हिस्कीच्या दोन बॉटल अश्या चार बॉटल किंमत ४०० रुपयाच्या हिसकावून घेतल्या. त्यांना कुणालने थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याला धक्काबुक्की केली. तिघांवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३९४,३२३, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. यापैकी आशूतोष व पंकज या दोघांना या पूर्वीच अटक केली होती. आता २० दिवसांनंतर तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बन्साेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस नायक शिपाई जागेश्वर उईके, छगन विठ्ठले, सुबोध बिसेन, ओमेश्वर मेश्राम, संतोष बोपचे, विजय मानकर, प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, सतीश शेंडे यांनी केली आहे.