आज संपणार वनकोठडी : तिन्ही आरोपींकडे वेगवेगळे अवयव गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. या तिन्ही आरोपींकडे अस्वलाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव मिळाल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र अस्वलाचे हे अवयव ते कोणाला विकणार होते? त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.अटकेत असलेल्या आरोपींपैकी सुखदेव रामचंद्र भांडारकर (५९), यादोराव गजानन रहांगडाले (५१) यांची वनकोठडी दि.१७ ला संपणार आहे. दरम्यान या प्रकरणात भास्कर चिंदाकूर (३०) रा.तिल्ली यालाही अटक करण्यात आली. या आरोपींच्या वनकोठडीत वाढ होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.गोरेगाव वनपरिक्षेत्रातांतर्गत तिल्ली-मोहगाव येथील शेतात विद्युत करंट लावून अस्वलाची शिकार करण्यात आली. यानंतर अस्वलाच्या शरीराचे अनेक अवयव काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृत अस्वलाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरएफओ एस.एन. जाधव सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाचे लिंग, नख, काळीज, दात व इतर काही आंतरित अवयव काढून घेण्यात आल्याचे आढळले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सरगर यांनी उत्तरीय तपासणी केली व अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. यानंतर चार दिवसातच श्वानाच्या मदतीने तीन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील अस्वलाचे अवयव जप्त करण्यात आले. अस्वलाची शिकार अंधश्रद्धेतून करण्यात आली नसल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्हया प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते कॉल स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्या अस्वलाची शिकारच झाली यावरही वनविभागाचे अधिकारी अद्याप ठाम नाहीत. अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही अधिकारी वर्तवित आहे. त्यामुळे आरोपींना वाचविण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अस्वलाच्या अवयवांची विक्री कोणाला होणार होती, त्याचा वापर कोण आणि कशासाठी करणार होते, याचा सखोल तपास करून प्रकरणाच्या शेवटपर्यंत जावे अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.
अस्वल शिकारप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक
By admin | Published: February 17, 2017 1:43 AM