गोंदिया : समविचारी पक्षांना डावलून आणि हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. तेव्हापासून त्यांच्या पक्षाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून न घेता केवळ एककल्ली विचार केला. त्यामुळे त्यांची आज ही दशा झाली आहे. यापुढे त्यांचा पक्ष केवळ हम दो आणि हमारे दो पर्यंतच मर्यादित दिसेल अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
प्रदेशाध्यक्षपदाची सत्रे हाती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पहिल्यांदाच बुधवारी (दि.१२) गोंदिया येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत आपण १९ जिल्ह्यांचा दौरा केला असून हा २० वा जिल्हा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट अशी युती करून यापुढे सर्व निवडणुका लढण्याची आम्ही तयारी केली आहे. ४५ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा जिकंण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटन बांधणी आणि पक्षाच्या विस्तार करण्यासाठी जिल्हानिहाय दौरे सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले.
भारताला शक्तिशाली करण्यासाठी युवा वॉरियर्स भाजपसोबत जोडत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला, अशा लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी अभियान राबविले जाणार आहे. २०२४ पर्यंत दोन कोटी लाभार्थी या अभियानात सहभागी होतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेला खा. सुनील मेंढे, अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पकंज रहांगडाले, परिणय फुके, माजी आ. गोपालदास अग्रवाल, हेमंत पटले, माजी नगराध्यक्ष वीरेंद्र अंजनकर, रमेश कुथे, अश्विनी जिचकार उपस्थित होते.
शिफारशीवर नव्हे जनमतावर तिकीट
आगामी नगर परिषद, महानगर पालिका व इतर निवडणुकीत उमेदवारी देताना कुणाची शिफारशी ती मिळणार नसून जनमत घेऊनच तिकीट देण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा आधार आणि जनतेचा कल कुणाला आहे, त्याच उमेदवाराला तिकीट दिले जाईल असे बावनकुळे यांनी सांगितले.
नाना पटोलेंना गांभीर्याने घेऊन नका
दिवस निघाला की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप टीका करीत असतात. अलीकडे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका असे बावनकुळे यांनी सांगितले.
दहिवले घेणार हातात कमळ
काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी बुधवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे बंद चर्चा झाली. दहिवले हे मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दुय्यम वागणुकीने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने ते लवकरच हातात कमळ घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात दहिवले यांना विचारले असता ही औपचारिक भेट असल्याचे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"