गोंदिया : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद आहेत. तर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या कालावधीतील शालेय पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या जवळपास १ लाख ८३ हजार ७१३ विद्यार्थ्यांना बँक खाते उघडावे लागणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३४ रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या १५६ रुपयांसाठी १ हजार रुपये खर्च करून बँकेत उघडावे लागणार आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच कोरोनामुळे अनेकांच्या हाताला अद्यापही काम नाही. मात्र अशा स्थितीत पोषण आहाराच्या रकमेसाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडावे लागणार आहे. शासनाच्या या नव्या आदेशामुळे पालकांमध्येसुध्दा संभ्रमाचे वातावरण आहे. तर शिक्षकांनी सुध्दा पोषण आहाराची रक्कम बँक खात्याला घेऊन शंका व्यक्त केली आहे. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांची बँक खाती बंद असल्याने पैसे जमा कसे होणार असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
.............
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पहिली : २०९७४
दुसरी : २८८५६
तिसरी : १९९९१
चौथी : २९५६४
पाचवी : २०२५३
सहावी : १९९२८
सातवी : १५६३१
आठवी : ३०५७८
..........................
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार : १५६
सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार : २३४
......................
बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
- जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारे एकूण १ लाख ८३ हजार ७१३ विद्यार्थी आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांचे बँकेत खाते आहेत.
- विद्यार्थ्यांना बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना १ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.
- ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी आहेत. ते सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहे. त्यांना ही कामे सोडून पाल्याचे बँकेत खाते उघडण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
- शासनाने पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी लागू करण्यासाठी बँकेत खाते उघडण्याची लागू केली अटींने शिक्षकांमध्येसुध्दा नाराजीचा सूर आहे.
..........
पालकांची डोकेदुखी वाढली
माझा पाल्य पहिल्या वर्गात असून त्याला शालेय पोषण आहाराची रक्कम मिळण्यासाठी आता बँकेत खाते उघडावे लागणार आहे. यासाठी हजार रुपयांचा खर्च येणार आहे. शिवाय यासाठी बँकांची पायपीट करावी लागणार आहे.
- विजय उमक, पालक
...............
शालेय पोषण आहाराची रक्कम जमा करण्यासाठी बँकेत खाते उघडण्याची अट ही डोकेदुखीची आहे. दीडशे रुपये मिळणार असले तरी पालकांना बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
- रामदास वाघमारे, पालक
............
शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शालेय पोषण आहाराचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडावे लागणार आहे.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.
................