गोंदिया : उन्हाळ्याला सुरुवात होताच जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. तेंदूपत्ता आणि मोहफुलाचे संकलन करण्यासाठी नागरिक जंगलामध्ये आगी लावतात. मात्र याप्रकारामुळे मौल्यवान वनसंपत्ती नष्ट होत असून याला प्रतिबंध लावण्यासाठी वन विभागाच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण अधिक असून २८ तेंदूपत्ता युनिट आहे. तसेच या जंगलामध्ये मोहा वृक्षाचे प्रमाण देखील अधिक आहे. यंदा मागील दहा ते पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात लावलेल्या वणव्यामुळे हजारो हेक्टरमधील वनसंपदा जळून राख झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यात संवेदनशील क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नवेगावबांध- नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर झोन आणि चिचगड, सालेकसा, तिरोडा, उत्तर देवरी, सडक अर्जुनी, गाेरेगाव, नवेगाव, गोठगाव या वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनांमुळे हजारो हेक्टरमधील वनसंपत्तीचे नुकसान झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. तेंदूपत्ता संकलन आणि मोहफुले वेचण्यासाठी काही जण रात्रीच्यावेळीस जंगलात आग लावत असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र आगीमुळे मौल्यवान संपत्ती नष्ट होत आहे. याला प्रतिबंध लावण्यात वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळ हे तिन्ही विभाग समन्वयाअभावी अपयशी ठरत आहे.
......
जिल्ह्यात दररोज वणव्याच्या ३५ घटना
जंगलात लागणाऱ्या वणव्यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी फाॅरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियातर्फे सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. वणव्याची माहिती फायर वॉचर टीम आणि संबंधित वन विभागाला दिली जाते. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जंगलात वणवा लागण्याच्या दरराेज ३५ घटना घडत आहेत.
..............
वणवा नियंत्रणासाठी ५० फायर वॉचर टीम
उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी ५० फायर वाॅचर टीम गठित करण्यात आल्या आहे. एका टीमध्ये ३ सदस्यांचा समावेश आहे. वॉच टॉवर, सॅटेलाईट, वनरक्षक, वन मजूर यांचीसुध्दा मदत घेतली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २६ फायर ब्लोअर सुध्दा या टीमला उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
..................
२ एप्रिलला ५० आगीच्या घटनांची नोंद
तेंदूपत्ता आणि मोहफुल संकलनासाठी काही नागरिक जंगलामध्ये रात्रीच्या वेळेस आगी लावतात. शुक्रवारी (दि.२) जिल्ह्यातील जंगलामध्ये ५० ठिकाणी आग लागल्याची घटनांची नोंद झाल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
..................
कोट :
जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वन्यजीव विभागातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी फायर वाॅचर टीम देखील तयार करण्यात आली असून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. तसेच पांगडी आणि देवरी परिसरात दोन नवीन वॉच टॉवर सुध्दा तयार करण्यात आले आहे. यामुळे वणव्याच्या घटना बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या आहेत.
- कुलराजसिंग, उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग.
..........
जंगल परिसरात राहणारे काही नागरिक मोहफुले वेचण्यासाठी जंगलामध्ये आग लावून निघून जातात. यामुळे वणवा लागण्याच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.
नितीन सिंग, विभागीय वन व्यवस्थापक, वनविकास महामंडळ
..........
दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र या घटनांना प्रतिबंध लावण्यात वन, वन्यजीव, वनविकास महामंडळ या तिन्ही विभागाची यंत्रणा समन्वयाअभावी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. फाॅरेस्ट प्रोटेक्शन ॲक्टनुसार तेंदूपत्ता युनिटमध्ये आग लागल्यास संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याची तरतूद आहे. पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
- सावन बहेकार, मानद वन्यजीवरक्षक
...........