देवरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाळ्यात देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, गिट्टी व डांबर वाहून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे काय, असा प्रश्न नागरिक करत आहे. या मार्गावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील सिरपूर ते भिलेवाडा (भंडारा) पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अशोक हायवे प्रा. लि. कंपनीव्दारा बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आला आहे. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी असूनही कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग गेला असून शहरातसुद्धा जागोजागी खड्डे पडले आहेत. सिरपूरपर्यंत रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. भर्रेगाव व रूप रिसोर्टजवळ रस्ता पूर्णपणे उखडला असून, यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे वाहनसुद्धा बऱ्याच प्रमाणात खराब होत आहेत.
चौपदरीकरण असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १० हजार लहान-मोठे वाहन ये-जा करतात. या वाहनांकडून शेंदूरवाफा येथे ७० ते ४०० रुपये पर्यंत टोलवसुली घेतली जाते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर रस्ता दुरुस्त करा व नंतरच टोल घ्या अन्यथा टोलवसुली बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
----------------------
टोल कंपनी व महामार्ग प्राधिकरणावर गुन्हे दाखल करा.
विशेष म्हणजे, दरवर्षी या महामार्गाच्या खड्ड्यांत पडून शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु कुणीही त्यांना मदत केली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन व संबंधित टोल कंपनीला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.