कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलातून निघून काही काळ निसर्गाच्या सानिध्यात निवांत घालविण्यासाठी आज सर्वांचीच धडपड सुरू असल्याचे दिसते. यासाठीच नागरिकांचा कल आता मोठ्या शहरांमध्ये न जाता वन पर्यटनाला जास्त पसंती देत आहेत. जिल्हावासीयांना यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत आहे. मात्र कोरोनामुळे वन पर्यटनाच्या मार्च ते जून या मुख्य हंंगामात प्रकल्प बंद होते. परिणामी मागील वर्षातील आकडेवारी बघता सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला मुकले आहेत. तर यामुळे वन विभागाचे सुमारे १८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे.
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉंक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या माणसालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत असून यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहे. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.
यासाठी जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सन २०१९ मधील मार्च ते जून महिन्यातील पर्यटकांची आकडेवारी बधितल्यास मार्च महिन्यात महिन्यात ३७८५ पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली असून यातून वनविभागाला तीन लाख ५४ हजार १७ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एप्रिल महिन्यात ४६२० पर्यटकांनी भेट दिली असून चार लाख ६९ हजार ३८० रुपए, मे महिन्यात ६५४० पर्यटकांनी भेट दिली असून पाच लाख ७३ हजार ६०५ रुपए तर जून महिन्यात ५५६७ पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली असून यातून व विभागाला चार लाख ५८ हजार ५५ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. म्हणजेच, एकूण ४ महिन्यांत व्याघ्र प्रकल्पाला २० हजार ५१२ पर्यटकांनी भेट दिली असून वन विभागाच्या तिजोरीत १८ लाख ५५ हजार ५७ रुपए आले आहेत.
यंदा मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यातच लॉकडाऊन करण्यात आले व त्यामुळे ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद झाले व ते आतापर्यंत बंदच आहे. अशात मागील वषार्तील पर्यटक त्यांच्यापासून प्राप्त उत्पन्नाला बघता यावर्षी सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला मुकले असून त्यापासून सुमारे १८ लाख रूपयांच्या उत्पन्नाला वन विभाग मुकला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.