गोंदिया : आमचा ट्रक सोडा नाही तर खोट्या तक्रारीत अडकविणार अशी धमकी मोटारवाहन निरीक्षकांना देत काहींनी शासकीय कामात अडथळा घातला. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत सिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाका येथे मंगळवारी (दि.१५) सकाळी ९.४७ वाजतादरम्यान हा प्रकार घडला.
फिर्यादी मोटारवाहन निरीक्षक शिवजोती मच्छींद भांबरे (३३) या सिरपूरबांध तापसणी नाका येथे ड्यूटीवर असताना जळगाव येथून छत्तीसगडला जाण्याकरिता सकाळी ९.४७ वाजतादरम्यान शेतीला लागणारे खत सदृश पावडर भरलेला ट्रक क्रमांक एमएच १८- बीजी ०३०० तेथे आला. कर्मचाऱ्यांनी ट्रकला सदभावनी कंपनीच्या वजनकाट्यावर लावले व ट्रक मध्ये नियमापेक्षा ४७५ किलो माल जास्त असल्याने ट्रकचे कागद व चालकाचा परवाना घेऊन फिर्यादीकडे गेले. यावर चालकाने दंड न भरता फोन करून आरोपी क्रमांक १ व २ यांना बोलावून घेतले. ते आल्यावर आरोपी क्रमांक १, २ व ३ यांनी फिर्यादीला आमची गाडी सोडा नाहीतर खोट्या तक्रारीत अडकविणार अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी नाक्यावर उभे राहून इतर वाहनांची कागदपत्र स्वत: तपासून ८-१० वाहनांना सोडून दिले. फिर्यादीने त्याना तसे न करण्यास सांगीतले असता आरोपींनी पैसे घेण्यासाठी गाड्या थांबविता असे बोलून शिवीगा करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्रकरणी देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.