गोंदिया : डिसेंबर महिन्यात आठ दिवसांच्या कालावधीत झालेल्या तीन खुनातील आरोपींना पोलीस पकडू शकले नाही. मारेकऱ्यांना पोलिसांचे अभयदान तर नाही ना अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मात्र या तिन्ही प्रकरणातील मृतांची हत्या झाली की नाही हे अद्यापही पोलीस स्पष्ट करू शकले नाही. परिणामी मृतांच्या नातेवाईकांत असंतोष आहे.आमगाव तालुक्याच्या कातुर्ली येथील रहिवासी सुशील सिताराम कोरे (४०) यांचा २४ डिसेंबर रोजी रात्री खून करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. २५ डिसेंबर रोजी सकाळी ईर्री परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरून काही अंतरावर दोन-तीन ठिकाणी रक्ताचे डाग आढळल्याने हा घातपात असावा, असा कयास लावला जात आहे. या घटनेला २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी गोंदिया ग्रामीण पोलीस या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही. या प्रकरणाची थातूर-मातूर चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनास्थळाच्या जवळ जेथे-जेथे रक्ताचे डाग आढळले त्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. परंतु तपासाची दिशा कुठपर्यंत गेली याची माहिती ग्रामीण पोलीस नातेवाईकांना देत नसल्याची ओरड आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार आडे करीत आहेत. मात्र ते आता सुट्टीवर गेल्याने तपास अडून पडला आहे. दुसरी घटना सालेकसा तालुक्याच्या बोदलबोडी येथील आहे. जेवण करून स्वत:च्या खोलीत झोपलेल्या तरूणाचा मृतदेह २८ डिसेंबर रोजी सकाळी दरबडा ते धानोली दरम्यान कालव्यात आढळून आला. अरूणकुमार नंदलाल हत्तीमारे (२७) रा. बोदलबोडी असे मृत तरूणाचे नाव आहे. अरूणकुमारचा खून झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. मात्र पोलीस हवालदार पुरी या प्रकरणाला दडपून एकतर्फी प्रेमात आलेल्या नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचा कांगावा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील तपास काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास रखडलेला आहे. झोपलेला तरूण घरापासून दोन ते तीन किमी अंतरावर रात्रीच्या वेळी गेला कसा? त्याला आत्महत्या करायची होती तर तो स्वत:च्या खोलीतच आत्महत्या करू शकला असता. परंतु दोन किमी अंतरावर तो गेला कसा व त्याला फोन करून कुणी बोलावले की प्रत्यक्षात कुणी बोलवायला आला होता हे पोलिसांच्या तपासात येऊ शकते. परंतु पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करायला हवा. तिसरी घटना सालेकसा तालुक्यातील रुंगाटोला येथील आहे. अंकालू चैतराम परतेती (४७) याचा ३१ डिसेंबर रोजी रात्री खून करण्यात आला. त्यांचा चेहरा जाळण्यात आला होता. रुंगाटोलाच्या पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी टाकीवर ते काम करीत होते. घटनेच्या दिवशी ते पाणी टाकीवर कामासाठी गेले होते. दररोज संध्याकाळी कामावर जाऊन रात्रीच्या वेळी तिथेच थांबायचे. ज्या ठिकाणी पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूला काही बिहारी व्यक्ती मासे पकडण्याकरिता राहतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी घरुन गेल्यावर रात्रीच्या वेळी अंकालू परतेती यांनी त्या बिहारी लोकांसोबत जेवण केले. मात्र त्यानंतर रात्रीच ते बेपत्ता झाले. १० दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळला. या ठिकाणी राहणाऱ्या एका बिहारी व्यक्तीला पोलिसांनी बिहारमध्ये पकडले. त्या प्रकरणातीलही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. (तालुका प्रतिनिधी)
तीन खुनातील आरोपी मोकाटच
By admin | Published: January 18, 2015 10:45 PM