लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घातपात करणाऱ्यांना मदत म्हणून देशी पिस्तूल विक्रीचा गोरखधंदा गोंदियात सुरू आहे. हा गोरखधंदा करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१०) सायंकाळी ४ वाजता अटक केली आहे. रामनगर पोलीस ठाण्यांर्गत गड्डाटोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहायक फौजदार लिलेंद्र बैस, करपे, पोलीस नायक तुरकर, शेख, महिला शिपाई गेडाम व पांडे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गड्डाटोली येथील प्रेरणा रामटेके यांच्या घरासमोर दोन इसम उभे दिसले. पथक तेथे गेले असता ते रामटेके यांच्या घराच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेले. त्यांच्या मागे पायऱ्यावरून पहिल्या माळ्यावर गेल्यावर दोन इसम व एक महिला वऱ्हांड्यात दिसली.यावेळी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये (२१, रा. सिल्लेगाव) याच्या जवळून पिस्तूल घेतले व तो बजाज हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रेरणा रामटेके यांच्या घरासमोर पिस्तूल विक्री करण्यासाठी उभा होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये, रवींद्र रमेश बोरकर (२२,रा. नागपूर, ह.मु. सूर्याटोला) व पप्पू उर्फ व्ही.उमेश व्ही. नरसिंहराव (३५, रा. मरारटोली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ७.६५ बोअर असलेली पिस्तूल किंमत ५० हजार रुपये, मॅगझिन १६ सेमी. लांबीची व मुठीच्या बाजूने चेंबरपर्यंत ९.५ सेमी रुंदी असलेली व ९ सेमी. असलेली ज्यामध्ये एक जिवंत काडतूस असलेली पिस्तूल जप्त करण्यात आली. या संदर्भात आरोपींविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.