बाराभाटी : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुरावर तीन अस्वलांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. जवळील ग्राम खैरी बोरटेकरी रामघाट जंगलात रविवारी (दि.२३) पहाटे ५.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. शैलेश भय्यालाल रामटेके (३२,रा.बोळदे) असे जखमी मजुराचे नाव आहे.
शैलेश रामटेके यांच्यासह गावातील चार महिला व अन्य एक पुरुष वनविभाग खैरी बोरटेकरी रामघाट जंगल परिसरात पहाटेच्या सुमारास तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेले होते. हा परिसर मोठ्या प्रमाणात झुडपी असल्याने त्यांना अस्वल दिसले नाही. मात्र तेथे अस्वल आपल्या पिल्लांसोबत बसले होते व आपल्या पिल्लांच्या संरक्षणाच्या उद्देशातून त्यांनी हल्ला केल्याचे समजते. यात शैलेशच्या डाव्या खांद्यावर अस्वलाने हल्ला करून जखम केली आहे. जीव वाचविण्याच्या नादात शैलेश पळाला असता त्याची झाडाला धडक झाली आणि पडल्याने डाव्या पायाला पण गंभीर मार लागला आहे. घटनास्थळी असलेले इतर इसम ओरडल्यामुळे अस्वल तिथून पळून गेले. त्यानंतर शैलेशला लगेच ७ वाजता दरम्यान अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्याची परिस्थिती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
अर्जुनी- मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी भ्रमणध्वनी स्वीकारला नाही. तसेच या भागाच्या बिटरक्षक यांना सूचना देऊनही त्यांनी सायंकाळपर्यंत पंचनामा करतो असे सांगितले. तर जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांनीही फोन स्वीकारला नाही. जखमी मजूर सुशिक्षित बेरोजगार असून हाताला काम नसल्याने तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहे. घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असून वनविभागाने पाच लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी शैलेश, त्याचे वडील भय्यालाल व कुटुंबीयांनी केली आहे.
-------------------------
मी स्वतः डिसीएफ कुलराज सिंग यांना फोन केला तर त्यांनी फोन स्वीकारला नाही. वनविभाग वाऱ्यावरच असल्यासारखा आहे. जखमी मजुराला शासनाची मदत तातडीने मिळावी असा प्रयत्न सुरु आहे.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार अर्जुनी-मोरगाव विधानसभा.