गोंदिया : रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुडवा येथे ८ मे रोजी पहाटे ४ वाजता तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी रावणवाडी येथे चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या जवळून ५५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चोरी, घरफोडींच्या घटनांवर आळा घालण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ८ मे रोजी गोंदिया शहर, रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना रामनगर हद्दीत कुडवा येथे पहाटे ४ वाजता तीन इसम संशयितरीत्या अंधारात एका मोटारसायकलवर बसून भरधाव वेगात जाताना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांच्याजवळ एक लाल, पिवळ्या रंगाची पिशवी रवी ज्वेलर्स कामठा असे लिहिलेली दिसून आली. त्या पिशवीत चांदीचे करंडे, जोड करंडे, नंदादीप, समई, कुईरी, लहान-मोठे ट्रे, प्लेट, लहान-मोठे ग्लास, लहान-मोठ्या वाट्या, छोटा लोटा, छोटे चमचे, जुनी गोफ, जोडवे, असा ऐवज मिळून आला. आरोपी अजय श्रीराम तेलंग (३३), रा. गौतमनगर बाजपेयी वाॅर्ड गोंदिया, आकाश कमलाकर पवार (२४), रा. लक्ष्मीनगर, आंबेडकर वाॅर्ड हनुमान मंदिराजवळ गोंदिया, प्रथमेश सिद्धार्थ वैद्य (१८), रा. लक्ष्मीनगर गौतमबुद्ध वाॅर्ड कुंभारेनगर नाना चौक गोंदिया, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५५ हजारांचा ऐवज जप्त केला. कामठा येथील रवी ज्वेलर्सचे कुलूप तोडून चोरी केल्याचे सांगितले. रावणवाडी पोलिसांत या आरोपींवर भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, लिलेंद्र बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, अजय रहांगडाले, विजय मानकर यांनी केली.