पालकमंत्र्यांची माहिती : नवीन सीटी स्कॅन मशीनसाठी तीन कोटी लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सभेत सोमवारी (दि.१०) सन २०१६-१७ च्या २३२ कोटी ३३ लाख ४६ हजार रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. तसेच गोंदिया जिल्ह्यातील तीन नवीन तीर्थक्षेत्रांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत विविध विषयांवर माहिती दिली. यात ३०० सेमी.च्या झाडांना १ हजार रुपये पेंशन देण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात १४ हजार मोठी झाडे असून यापैकी १ हजार ३०० झाडांचे मोजमाप करुन त्या झाडांच्या मालकांना पेंशन दिली जाणार आहे. सन २०१६-१७ च्या जिल्हा वार्षिक योजनेत जून अखेरपर्यंत खर्च झालेल्या ३० कोटी ६२ लाख ४४ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सेंद्रीय शेतीद्वारे उत्पादीत तांदळाची पिशवी देऊन शेतकऱ्यांचे स्वागत करण्याचा पायंडा यापुढे शासकीय कार्यालयात करण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे महिनाभरात भरण्यात येतील. जिल्हा वार्षिक योजना सन २०१६-१७ मधील दायित्वाच्या निधीतील मागणी कार्यान्वित यंत्रणांनी त्वरित करावी, पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी जमीन संपादनाची कारवाई एक महिन्यात करण्यात यावी. लोकांच्या मागणीप्रमाणे ककोडी येथे बँकेची शाखा उघडण्यात यावी, आदिवासी उपाय योजनेंतर्गत टीएसपी ठक्कर बाप्पा योजनेचा निधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात वातानुकूलीत शस्त्रक्रिया कक्ष, जिल्हा परिषदेत दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी लिफ्टची व्यवस्था, क्रीडा संकुलात विद्युतची सोय, कचारगड, हाजराफाल व नवेगावबांध येथे रोपवे, जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धम्मगिरी, गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा व तिरोडा तालुक्यातील बोळुंदा यांना तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन अखेरच्या घटका मोजत असल्याने नवीन सीटी स्कॅन मशीन आणण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. ३० जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी जास्तीत जास्त हप्ता भरावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, आ. गोपालदास अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते.ना चौकशी, ना कारवाई जिल्हा विकासासाठी शासन दरवर्षी पैसे देते. सन २०१६-१७ या वर्षातील जिल्हा विकासासाठी आलेले ४ कोटी ९२ लाख रुपये लॅप्स झाले आहेत. पर्यटनाचे १ कोटी ८० लाख ८६ हजार, आमदार निधीचे १ कोटी १० लाख तर जिल्हा नियोजनचे २ कोटी १ लाख रुपये लॅप्स झाले आहेत. ५ कोटीने जिल्हाच्या विकास खुंटला असूनही तीन महिने लोटूनही हलगर्जीपणा करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. चौकशी करुन कारवाई केली जाणार असल्याचे नेहमीच सांगितले जाते. मात्र तसे होताना दिसत नाही.
तीन नवीन तीर्थक्षेत्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 12:49 AM