आरोपींची संख्या पाच झाली : न्यायालयीन कोठडी गोंदिया : आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळाची शिकार करून फुक्कीमेटा येथील आरोपीच्या घरी चामडे काढताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाला रंगेहात पकडले होते. यातील चार आरोपी फरार झाले होते. त्यातील आणखी तीन आरोपींना वन विभागाने गुरूवारी (दि.४) अटक केली आहे. यात शत्रुघ्न मन्साराम सोनवाने (रा.पाऊलदौनाल), विरेंद्र उर्फ पिंटू फंदू लटये (रा.अंजोरा) व गणेश चुन्नीलाल कटरे (रा.अंजोरा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आमगाव तालुक्याच्या फुक्कीमेटा येथील आरोपी हिवराज उर्फ मधू लक्ष्मण सापके (४५), शत्रुघ्न सोनवाने व इतर तीन अशा पाच जणांनी पाऊलदौना जंगलात करंट लावून १२ मार्चच्या रात्री एका चितळाची शिकार केली. शिकार केलेले चितळ पाऊलदौना येथे आणून आरोपी हिवराजच्या घरामागील वाडीत बांबुच्या असलेल्या झाडाला हे चितळाचे शरीर टांगून चामडे काढणे सुरू होते. याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठले. परंतु वनाधिकाऱ्यांना पाहून चार आरोपी फरार झाले होते. फरार असलेल्या चार पैकी शत्रुघ्न मन्साराम सोनवाने (रा.पाऊलदौनाल), विरेंद्र उर्फ पिंटू फंदू लटये (रा.अंजोरा) व गणेश चुन्नीलाल कटरे (रा.अंजोरा) या तिघांना वनपरीक्षेत्राधिकारी डी.बी. पवार, क्षेत्र सहाय्यक एल.एस. भुते, आर.जे. भांडारकर,बीट रक्षक ओ.एस. बनोटे, एच.के. येरणे, के.एस. बिसेन, सोनवाने, रहांगडाले, राजू बावणकर, व सोमवंशी यांनी गुरूवारी (दि.४) अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक मोटारसायकल, दोन सायकल व वन्यप्राण्यांना अडकविण्यासाठी लावलेले जाळे जप्त करण्यात आले. चितळाची शिकार केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सदर आरोपीविरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल आहे. (तालुका प्रतिनिधी)
चितळ शिकार प्रकरणात आणखी तिघांना अटक
By admin | Published: May 05, 2017 1:41 AM