जलसंपदामंत्र्यांची ग्वाही : टप्पा-२ साठी लागणार ६०० कोटीतिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यास ९० हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. टप्पा-१ हा जवळपास पूर्ण झाला असून टप्पा २ चे भूमिपूजन येत्या हिवाळी अधिवेशनाच्यावेळी डिसेंबरमध्ये करणार. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात धापेवाडा प्रकल्पाचे टप्पा-२ आणि ३ पूर्ण करणार, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी दिली. ना.महाजन यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेची पाहणी केली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ना.महाजन म्हणाले, टप्पा १ चे काम पूर्ण झाल्यावर ३८००० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार आहे. या परिसरात उन्हाळी पिके दिसत नसून येथील श्ेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खरीप पिकावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर शेतीला बारमाही पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी धापेवाडा योजनेचे टप्पा २ व ३ पूर्ण होणे गरजेचे आहे. आमदार विजय रहांगडाले त्यासाठी पाठपुरावा करीत असून हे काम तीन वर्षात होईल, असे ना.महाजन म्हणाले.या भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कारखानदारीवर नाही. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी पाण्याची गरज आहे. धापेवाडा सिंचन प्रकल्पाला पैशाची कमतरता पडणार नाही. पुढील तीन वर्षात आपल्या शासन काळात टप्पा-२ व ३ पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितले की, धापेवाडा हा सिंचन प्रकल्प फारच महत्वाचा आहे. यासाठी गरज पडल्यास मंत्रालयात सुद्धा बैठक घेऊन पैशाचे नियोजन कसे करता येईल व तीन वर्षात राहिलेले प्र्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे ना.महाजन म्हणाले.यावेळी आ.विजय रहांगडाले यांनी सांगितले की, या क्षेत्रात हरीत क्रांती आणायची असेल तर हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. टप्पा-१ अद्याप पूर्ण होऊ शकला नाही. तो यावर्षी पूर्ण होणार अशी अपेक्षा आहे. २३० मिटरचे काम राहिले आहे. ग्रॅव्हेटी फोर्सने गंगाझरीपासून पाणी जाणार आहे. ते कामसुद्धा पूर्ण होण्याच्या स्थितीमध्ये आहे. परंतु टप्पा-२ पूर्ण होत नाही तोपर्यंत तिरोडा तालुक्याला पाणी मिळणार नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. इतका उशीर लागण्याचे कारण, हे जुने लेआऊट होते. चुरडी, चिखली, भिवापूर असे बोदलकशात पाणी टाकायचे होते. सर्व शेतकऱ्यांनी ना-हरकती दिल्या, परंतु लोधीटोला येथील शेतकऱ्यांनी ना हरकरती न दिल्याने लाईन बदलावी लागली. बिरसी फाट्यापासून रस्त्याच्या बाजूने एक लाईन चोरखमारापर्यंत व दुसरी बोलदकसापर्यंत लेआऊट लाईन तयार केली. चोरखमाराची व पंपहाऊसची मंजुरी प्राप्त झाली आहे. या पावसाळ्यात टेंडरसुद्धा होणार आहे. त्यामुळे टप्पा २ व ३ साठी निधी देणार, अशी घोषणा करण्याची विनंती आ.रहांगडाले यांनी ना.महाजन यांना केली. यावेळी माजी आमदार व भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्यांवर मार्गदर्शन केले.प्रास्ताविक अधीक्षक अभियंता नार्वेकर यांनी केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, माजी आ. भजनदास वैद्य, चतुर्भूज बिसेन, संदीप बघेले, डिलेश पारधी, डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजयसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)तिरोड्यात ढोलताशात मंत्र्यांचे स्वागतना.गिरीश महाजन यांचे तिरोडा शहरात आगमन होताच शहराच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष अजय गौर, न.प. सदस्य सलीम जवेरी, आनंद बैस, कृउबासचे मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, भाऊराव कठाने, वसंत भगत, संजय बैस, राजेश गुणेरिया, तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन आणि ढोलताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. ना.गिरीष महाजन यांच्या टप्पा २ व ३ च्या पूर्ततेसाठी निधी कमी पडू देणार नाही या आश्वासनाने समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.
धापेवाडाचे तीनही टप्पे तीन वर्षांत पूर्ण करणार
By admin | Published: May 27, 2016 1:39 AM