सडक अर्जुनी : भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तीन कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील खजरीजवळ घडली. तुषार बिरजलाल शिवणकर (वर्ग ११) रा. मुरदोली व शुभम नंदकुमार भिमटे (वर्ग ११) रा. मुंढरीटोला व प्रवीण संतोष कटरे (वर्ग ११) रा. डव्वा अशी अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील तीन विद्यार्थी मोटरसायकलने विद्यालयात जात असताना कोहमारा ते गोंदिया मार्गाने जात असलेल्या मालवाहक पिकअप क्रमांक एनएच २० सीटी ६०१८ या वाहनाने धडक दिली. यात दोन विद्यार्थ्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यामध्ये तुषार बिरजलाल शिवणकर रा. मुरदोली व शुभम नंदकुमार भिमटे रा. मुंढरीटोला यांचा समावेश आहे. तर प्रवीण संतोष कटरे रा. डव्वा हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोंदिया येथील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास हायस्कूल खजरी येथील शिक्षक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. परंतु मालवाहक पिकअपचा चालक फरार झाला. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास डुग्गीपार पोलीस उपनिरीक्षक भुरले करीत आहेत.
.......
वाहतूक पोलीस हेल्मेट चेक करण्यात व्यस्त
गोंदिया-काेहमारा मार्गावरील अपघातांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ राहते. शिवाय अनेक शाळा आणि महाविद्यालये रस्त्यालगत आहेत. मात्र या ठिकाणी वाहतूक शिपाई अथवा ब्रेकर नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. वाहतूक पोलिसांचे लक्ष सध्या हेल्मेट आणि मास्क न लावणाऱ्याकडेच असून ते गावाच्या सीमेबाहेर तैनात ड्यूटी करून दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.