सडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम चिखली येथील रत्नदीप विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले व नीलकमल स्मृतिदिनी नीलकमल फाऊंडेशनच्यावतीने ‘नीलकमल स्मृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. एम. पातोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चित्रा भेंडारकर, केंद्रप्रमुख डी. टी. बावनकुळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सांकेत परशुरामकर उपस्थित होते. यावेळी मार्च २०२०मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (दहावी) विद्यालयातून प्राविण्यासह प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी तेजस्विनी यावलकर, द्वितीय क्रमांकप्राप्त रितीक मारवाडे, तृतीय क्रमांकप्राप्त देवेंद्र गभणे या विद्यार्थ्यांना नीलकमल स्मृती फाऊंडेशनचे आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्यावतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ व रोख पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, नीलकमल स्मृती फाऊंडेशनकडून पाचवी ते दहावीतील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक आयोजक मेश्राम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. मेंढे यांनी केले तर शिक्षक पी. एच. पटले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला शिक्षक एच. ए. लांडगे, एच. पी. डोंगरे, जयश्री कडव, डी. डी. कापगते, वाय. जी. कोरे व विद्यार्थी उपस्थित होते.