गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत मोटारसायकल चोरी करताना पकडलेल्या लोहारा येथील राजेश्वर किरसान (वय ३५) याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून सौंदड जवळच्या बोपाबोडी परिसरात त्याचा मृतदेह पुरला. हे प्रकरण १४ दिवसांनंतर उघडकीस आल्यावर लोहारा येथील ११ जणांच्या विरोधात दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, या प्रकरणात पोलिसांनीही हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक नीलेश उरकुडे, पोलीस हवालदार प्रताप पटले व भोजराज कानेकर या तिघांना निलंबित करण्यात आले.
निलंबनाची कारवाई ८ जुलैला पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केली आहे. २३ जूनला राजेश्वर किरसान याला मोटारसायकल चोरी करताना गावकऱ्यांनी पकडले. त्याला बेदम मारहाण करीत गावभ्रमण केले. त्यानंतर गाडीच्या डिकीत टाकून दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेल्यावर पोलिसांनी या प्रकरणात हलगर्जी केली. ठाणेदार नीलेश उरकुडे तो जिवंतच असल्याची थापा मारून स्वत: मृतकच्या पत्नीला धमकावीत होते. तो घरी न सांगता निघून गेला असे लिहून द्या म्हणून मृतकच्या पत्नीला पोलीस म्हणत होते. या प्रकणात पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळे ठाणेदार नीलेश उरकडे, पोलीस हवालदार प्रताप पटले व भोजराज कानेकर या तिघांना निलंबित करण्यात आले. राजेश्वर किरसान याच्यावर भादंविचे कलम ३०७ अन्वये यापूर्वीचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाचा वारंवार धडा वाचून ठाणेदाराने या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. नेते किंवा पत्रकारांनी विचारणा केल्यावर त्यांचीही दिशाभूल करून राजेश्वर जिवंतच आहे आम्हाला सुगावा लागला आहे असे बोलून या प्रकरणावर पांघरून घालण्याचे काम उरकुडे करीत होते. या प्रकरणात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी लक्ष घालून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना मागितला. याप्रकरणात करण्यात आलेल्या चौकशीत ठाणेदार व दोन पोलीस हवालदार दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.