सहा तासांत उघड : स्थानिक गुन्हे शाखेने लावला छडा
गोंदिया : गोंदियाच्या सिंगलटोली येथील सत्यपाल नागपुरे याची त्याच्याच तीन मित्रांकडून बुधवारी (दि.२१) सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. या खुनाचा अवघ्या सहा तासाच्या आत छडा लावून तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजय पृथ्वीराज बन्सोड (२२), आकाश रामदास बन्सोड (१९) व निशांत उत्तम मेश्राम (३२) तिन्ही रा. भीमनगर (गोंदिया) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगलटोली येथील रहिवासी रेणुका सत्यपाल नागपुरे यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात येवून तिचे पती सत्यपाल नागपुरे यांना डोक्यावर व पाठीवर जबर दुखापत करून जीवानिशी ठार केले, अशी माहिती दिली. त्यानुसार गोंदिया शहर पोलिसांनी अपराध क्रमांक-१४६, भादंविच्या कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी लगेच तपासकार्य सुरू केले. दरम्यान गोंदिया शहर परिसर, छोटा गोंदिया, रेलटोली, मामा चौक, श्रीनगर, माताटोली, वाजपेयी वार्ड, मुर्री, भीमनगर या परिसरात पोलीस गुन्हे प्रतिबंध गस्त करीत होते. यावेळी विश्वसनिय खबऱ्याकडून पोलिसांना सदर गुन्ह्यातील आरोपींविषयी माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी भीमनगर व सिंगलटोली परिसरातून आरोपी अजय पृथ्वीराज बन्सोड, आकाश रामदास बन्सोड व निशांत उत्तम मेश्राम या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी सदर गुन्ह्याबाबत तिघांनाही कसून विचारपूस केली. त्यावेळी तिन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून सत्यपाल नागपुरे यांचा खून केल्याची कबुली दिली. नागपुरे हे गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनने सरकारी तलावाजवळून एकटेच पायी जात होते. यावेळी आरोपी निशांत मेश्राम याने त्यांच्याशी बोलण्याचा बहाना करून तेथेच थांबवून ठेवले. यानंतर आरोपी अजय बन्सोड व आकाश बन्सोड यांनी त्यांच्याजवळ असलेल्या मोटारसायकलच्या शॉकअप्सने सत्यपाल यांच्या डोक्यावर व पाठीवर सपासप वार करून जागीच जीवानिशी ठार केल्याचे आरोपींनी आपल्या कबुली जवाबात सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेने पुढील तपास करण्यासाठी सदर आरोपींना गोंदिया शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, शंकर साठवणे, संतोष काळे, रामलाल सार्वे, पोलीस नायक भूवनलाल देशमुख, अजय सव्वालाखे, धनंजय शेंडे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, अशोक कापसे, सय्याय व लांजेवार यांनी यशस्वी केली. (प्रतिनिधी)