बिरसी फाटा : महसूल व पोलीस विभागाचे गाव प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील हे काम करीत असतात. याची या दोन्ही विभागांना मदत होत असते. मात्र एकाच पोलीस पाटलावर तीन गावांचा कारभार असल्याने पोलीस पाटलाची दमछाक होत असून रिक्त पद भरण्याची मागणी होत आहे.
गावस्तरावर पोलीस पाटील हे महत्त्वपूर्ण पद आहे. कोविड काळात सुध्दा आरोग्य विभाग आणि प्रशासनाला त्यांची बरीच मदत झाली. पोलीस पाटलांना निवडणूक, गावात होणारे अपघात, आत्महत्या, चोरी आदींची माहिती पोलीस विभागाला द्यावी लागते. तालुक्यातील करटी खुर्द येथील पोलीस पाटील अरविंद चौरे यांची मूळ नियुक्ती करटी खुर्द येथील असून मागील ४ वर्षांपासून त्यांच्याकडे करटी बु. आणि पालडोंगरी, भुराटोला या दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना करटी खुर्द, करटी बु. पालडोंगरी, भुराटोला व सिंदीटोला, गोंडीटोला या १० किमीचा प्रवास करावा लागतो. तसेच या गावांची माहिती व अहवाल सुध्दा त्यांनाच पाठवावा लागतो. त्यामुळे त्यांची सुध्दा दमछाक होत आहे. त्यामुळे पाेलीस पाटलाचे रिक्त पद भरण्याची मागणी केली जात आहे.