गोंदिया : लगतच्या बालाघाट जिल्ह्यातील लालबर्रा परिसरातील सोनेवानी जंगलात फिरायला गेलेल्या तीन युवकांना टेकाडी जलाशयात नाव उलटून जलसमाधी मिळाल्याची घटना गुरुवारी (दि.११) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
अश्विन ऊर्फ राजकुमार ब्रम्हे (२८), पनबिहरी रहिवासी पंकज (२९, रा. टेंगनी खुर्द) व दीपांकर बिसेन (रा. बघोली) असे नाव उलटून जलसमाधी मिळालेल्या युवकांची नावे आहेत. तर नावाडी कमलेश सांडिल्य व योगेश यादव (रा. घोटी) हेे पोहून बाहेर निघाल्याने सुखरूप बचावले. टेकाडी जलाशयात बुडलेल्या तिन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हे तरुण बालाघाट जिल्ह्यातील सोनेवानी जंगलात जंगल सफारी करण्यासाठी गुरुवारी (दि.११) सकाळी गेले होते. जंगल सफारी केल्यानंतर सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान याच परिसरातील टेकाडी जलाशयात नौका विहार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जलाशयात नावेतून विहार करीत असताना नाव अनियंत्रीत होवून उलटली. यात नावेतील पाचही जलाशयात बुडाले. यापैकी यातील एक युवक आणि नावाडी पोहून बाहेर निघाले व त्यामुळे ते सुखरूप बचावले. मात्र अश्विन, पनबिहारी व दीपांकर यांचा वृत्त लिहेपर्यंत शोध लागला नव्हता. त्यांचा शोध सुरू असल्याचे लालबर्रा पोलिसांनी सांगितले. जलाशयात बुडालेल्या तरुणांचा एसडीआरएफच्या पथकाच्या मदतीने शोध घेणे सुरू असल्याचे लालबर्राचे नायब तहसीलदार सतीश चौधरी यांनी सांगितले.