लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवकाळी पाऊस व किडरोगांमुळे धानाच्या नासाडीचा फटका सहन केल्यानंतर रब्बीतून काही हाती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटावर आता लाथ मारण्यासाठी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात मागील २-४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने रब्बी पीक धोक्यात आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांनी हरभरा, लाखोळी, जवस, ज्वारी, गहू व अन्य रब्बीपिकांची लागवड केली आहे. यातून तरी काही हाती येणार अशी अपेक्षा बाळगून धडपडत असलेल्या शेतकऱ्याला आता ढगाळ वातावरणाने टेंशन दिले आहे. जिल्ह्यात १९ हजार हेक्टरमध्ये यंदा रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यातही हरभरा व लाखोळीवर शेतकरी विसंबून दिसतो. यामुळेच सर्वाधिक ५११२ हेक्टरमध्ये हरभरा तर ६५४३ हेक्टरमध्ये लाखोळीची लागवड करण्यात आली आहे. मात्र ढगाळ वातावणारमुळे ही पिके धोक्यात दिसून येत असल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. ढगाळ वातावरण व त्यातच पाऊस बरसल्यास या पिकांवर किडरोगांची लागण होणार असल्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. यामध्ये गव्हाला तर कमी मात्र तूर, हरभरा व अन्य पिकांना जास्त धोका दिसून येत आहे.
पाऊस झाल्यास लाखोळी व हरभराला फटका
जिल्ह्यात मागील ४-५ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रब्बीपिक धोक्यात दिसून येत आहेत. अशात पाऊस झाल्यास हरभरावर घट्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर सध्या तूर लागली असल्याने शेंगा पोखरणारी अळी लागू शकते.
शेतकऱ्यांनी काय-काय काळजी घ्यावी
ढगाळ वातावरण व पावसाची स्थिती बघता शेतकऱ्यांनी कामगंध सापळे लावावे. तसेच पक्षी थांब्यांची व्यवस्था करावी. यानंतरही किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्यास कडुलिंबांच्या किटकनाशकाचा वापर करावा असे जिल्हा कृषी अधीक्षक गणेश घोरपडे यांनी सांगीतले.
उपाययोजनांची गरज
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर किडरोगांचा धोका दिसत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन उपाययोजना करण्याची गरज दिसून येत आहे.
- गणेश घोरपडे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी