लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात अनलॉक अंतर्गत नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला मंजुरी देण्यात आली असून आतापर्यंत खाजगी वाहनांना प्रवेशबंदी होती. मात्र आता नवे आदेश आले असून त्यानुसार व्याघ्र प्रकल्पात खाजगी वाहनांनाही प्रवेश दिला जाणार आहे. मात्र यासाठी काही अटी-शर्ती ठरवून देण्यात आल्या असून त्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. देशात कोरोना शिरल्यानंतर २५ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते. यांतर्गत कोरोनाचा प्रार्दुभाव बघता पर्यटन स्थळांवर पर्यटनाला बंदी लावण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पही पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता अनलॉक अंतर्गत १ नोव्हेंबरपासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे. परंतु व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी फक्त जिप्सींनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना त्यांचे खाजगी वाहन असून सुद्धा जिप्सीतूनच प्रकल्पात प्रवेश करावा लागत होता. मात्र यासाठी पर्यटकांना वाहनेची भाडे मोजावे लागत होते व कित्येकांना ते परवडणारे ठरत नव्हते. अशातच आता पर्यटकांना दिलासा देत शासनाने खाजगी वाहनांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे पर्यटकांना आता त्यांच्या खासगी वाहनांनीही व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करता येणार आहे. यातून त्यांना जिप्सी भाड्याने घेण्यासाठी येणारा खर्चही वाचणार आहे. एकंदर आता पर्यटकांना आपल्या वाहनाने आपल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करता येणार असल्याने ते आपल्या सोयीच्या वाहनाने जंगलसफारी करू शकतील.
६५ वर्षांवरील नागरिकांना प्रवेश नाहीच राज्य शासनाने पर्यटस्थळांना मंजुरी दिली असतानाच पूर्वी १० वर्षें वयापेक्षा लहान मुलांना तसेच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना परवानगी दिली नव्हती. त्यानुसार, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालाही नियम लागू होता. मात्र त्यानंतर १० वर्षांपर्यंतच्या मुलांना परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी १ नोव्हेंबर रोजी सुमारे १० मुलांनी प्रवेश केला होता. मात्र असे असतानाच ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना अद्याप पर्यटनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
या आहेत ठरवून दिलेल्या अटी-शर्ती नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात खाजगी वाहनांना परवानगी देण्यात आली असतानाच ठरवून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करणे मात्र बंधनकारक आहे. यात, वाहन क्षमतेच्या ५० टक्के एवढ्याच पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. जिप्सीमध्ये ४ पर्यटकांना (चालक व गाईड वगळून) प्रवेश दिला जाणार आहे. जिप्सीत एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींना (चालक व गाईड वगळून) प्रवेश दिला जाणार आहे. खाजगी चारचाकी वाहनात (लहान) २ पर्यटकांना (चालक व गाईड) वगळून प्रवेश दिला जाणार आहे. तर खाजगी वाहनात (मोठ्या) ४ पर्यटकांना (चालक व गाईड) वगळून प्रवेश दिला जाणार आहे.