बाराभाटी : जवळच्या सुरगावात गेल्या काही दिवसांपासून वाघाची चांगलीच दहशत आहे. आतापर्यंत या वाघाने गावातील घरांच्या गोठ्यातून वासरू तसेच कोंबड्या पण फस्त केल्या आहेत, तर नागरिकांना वाघाचे दररोज दर्शन होत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सुरगाव हा जंगलव्याप्त परिसर आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. मागील चार पाच दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर आहे. या वाघाने आतापर्यंत कोंबड्या व बकऱ्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन पंचनामासुध्दा केला. तसेच गावात सीसीटीव्ही कॅमरेसुध्दा लावण्यात आले आहेत. वन विभागाने वाघाला जेरबंद करुन जंगलात सोडण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मात्र, जोपर्यंत वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत गावकऱ्यांची चिंता कायम आहे.