गोऱ्या सरकारच्या काळात मी लहान होते. घोड्यांवर येणाऱ्या इंग्रजांची खूप दहशत होती. परंतु, दहशतीला बाजूला सारून गावंची गावे ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा करीत स्वातंत्र्यलढ्यात उतरली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा सोयीसुविधा अत्यंत कमी होत्या. जशी वेळ जात गेली तसा देश पुढेपुढे आला. आजघडीला दळणवळणाच्या साधनांपासून प्रत्येकाला सुखसोयीची साधने उपलब्ध झाली.
-मीराबाई हुकरे, पद्मपूर
..........
भारत स्वतंत्र झाला तेव्हा मी खूप लहान होतो. इंग्रजांच्या तावडीतून सुटलेल्या भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहताच देश भक्तिरसाने न्हाऊन निघत होता. शेती करूनच उदरनिर्वाह करून खेड्यांचा कारभार चालत होता. आता भारतातील प्रत्येक खेडी रस्त्याने जोडली गेली. आधी दळणवळणाची साधने नव्हती. पैसे कमी होते, तेव्हा तरी समाधान मानायचे. आता पैसे भरपूर आहेत तरी कुणाच्या मनात समाधान नाही आणि लोक एकमेकांची फसवणूक करू लागले.
- भिवाजी खोटेले, कोहळीटोला-आदर्श
.............
गोरे सरकार गावात आले म्हटले की महिला, मुले व पुरुष घरात जायचे. आम्ही लहान असताना त्यावेळी भारत इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाला. गांधीजींच्या नेतृत्वात देशात एकच लहर चालत होती. आधीच्या काळात देशप्रेम प्रत्येकात ओतप्रोत भरलेले होते. आता लोकांच्या मनात स्वार्थीवृत्ती आल्याने तेवढी देशभक्ती दिसत नाही. संसाधनांनी आपण खूप समोर आलो. परंतु, मानसिकरीत्या खूप मागासपणा आला आहे.
- बळवंतराव मेंढे, खातिया
..............