गोंदिया : मधूमेह आजाराला कंटाळून प्रौढाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि.२२) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास शहरातील गंज भाजीबाजार परिसरात घडली. दरम्यान हा प्रकार वेळीच नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच विहिरीत उडी घेतलेल्या प्रौढाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
नानकराम मनुजा (५२) रा. सिंधी कॉलनी असे आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या प्रौढाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार नानकराम मनुजा हे मागील काही वर्षांपासून मधूमेह आणि किडनीच्या आजाराग्रस्त आहे. याच आजाराला कंटाळून आलेल्या नैराश्यातून त्यांनी गुरुवारी (दि.२२) सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास गंज भाजीबाजार परिसरातील एका जुन्या सार्वजनिक विहिरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांना विहिरीत काही तरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी विहिरीकडे त्वरित धाव घेतली. दरम्यान नानकराम हे विहिरीत बुडत असल्याचे आढळले. त्यांनी लगेच विहिरीत दोरी आणि बालटी सोडून नानकराम यांना विहिरीतून बाहेर काढले. परिसरात उभ्या असलेल्या नागरिकांच्या सर्तकतेमुळे नानकराम मनुजा यांचे प्राण वाचविणे शक्य झाले.