गोंदिया : कधी कोरोनामुक्त झालेले जिल्ह्यातील तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव तालुका आता पुन्हा कोरोनाग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, आजघडीला गोंदिया तालुका वगळता सर्वाधिक रुग्ण याच तीन तालुक्यांत आहेत. यामुळे आता या तालुक्यांत धोका वाढत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोना परिस्थितीत हे तालुके ग्रीन झाले होते. यात तिरोडा तालुका कोरोनाचा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे. मात्र, तिरोडा तालुकाही कोरोनामुक्त झाला होता व त्यामुळे आता जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होणार असे वाटत होते. मात्र, राज्यात कोरोना फोफावू लागला असतानाच जिल्ह्यातही दररोजच्या बाधितांची आकडेवारी वाढू लागली. परिणामी कोरोनामुक्त झालेल्या या तालुक्यांतही कोरोना पुन्हा शिरला. यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे. गोंदिया तालुका सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट ठरला असून, या तालुक्यातच आतापर्यंतचे सर्वाधिक ८०७९ बाधित असून, ११८ क्रियाशील रुग्णही येथेच आहेत. मात्र, त्यानंतर तिरोडा, आमगाव व अर्जुनी-मोरगाव या तालुक्यांत प्रत्येकी १० रुग्ण आहेत. म्हणजेच, दुसऱ्या क्रमांकावर आता हे तीन तालुके आले आहेत. यावरून या तालुक्यांतही कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येत आहे.
--------------------------
एकमात्र देवरी तालुकाही अखेर बाधित
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून देवरी तालुका ग्रीन झाला होता. मात्र, वाढत्या उद्रेकापासून हा तालुकाही स्वत:ला वाचवू शकला नसून, शनिवारी (दि. ६) देवरी तालुक्यात कोरोना शिरल्याने कोरोनामुक्त असलेला हा एकमात्र तालुका पुन्हा बाधित झाला आहे. यावरून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याचे दिसत आहे. आज एकही तालुका कोरोनामुक्त नसल्याने खरबदारीची गरज आहे.
----------------------------
आता कारवायांची खरी गरज
राज्यातील काही तालुक्यांत वाढता उद्रेक बघता तेथील प्रशासनाला लॉकडाऊन करण्याची पाळी आली आहे. मात्र, त्यानंतरही जिल्हावासीयांना जिल्ह्यातील गंभीर होत चाललेल्या परिस्थितीशी काहीच घेणे-देणे दिसत नाही. यामुळेच ते कोरोनाला विसरून सैरावैरा वागत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास गोंदिया जिल्ह्यातही स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही व हे दररोजच्या वाढत्या आकडेवारीतून दिसून येत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आता कारावायांची गरज दिसून येत आहे.