गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाकडून राबविण्यात येत असलेल्या इंधन बचत अभियानात जिल्ह्यातील तिरोडा आगार राज्यात तिसऱ्या क्रमांकावर, तर गोंदिया आगार चौथ्या क्रमांकावर आले आहे. मुंबई येथे आयोजित अशा प्रथम पाच आगारांचा शुक्रवारी (दि. १२) सत्कार करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाकून दरवर्षी इंधन बचत अभियान राबविले जाते. याअंतर्गत परिवहन महामंडळ त्यांच्या निकषांनुसार प्रती किमी. किती डिझेल सेव्हिंग करण्यात आले हे बघून आगारांना क्रमांक देते. यामध्ये यंदा भंडारा जिल्ह्यातील साकोली आगाराने ५३.९३ पॉईंट्स घेत प्रथम, वर्धमान नगर नागपूर येथील आगाराने ५३.१२ पॉईंट्स घेऊन द्वितीय, जिल्ह्यातील तिरोडा आगाराने ५३ पॉईंट्स घेऊन तृतीय, गोंदिया आगाराने ५२.५६ पॉईंट्स घेऊन चतुर्थ, तर भंडारा जिल्ह्यातील पवनी आगाराने ५२ पॉईंट्स घेऊन पाचवा क्रमांक पटकाविला आहे. या प्रथम पाच आगारांचा मुंबई येथील कार्यालयात शुक्रवारी (दि. १२) आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यात गोंदिया आगाराकडून आगार प्रमुख संजना पटले यांनी, तर तिरोडा आगारचे प्रमुख पंकज दांडगे यांनी पुरस्काराची ट्रॉफी स्वीकारली.