लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : सध्याचे युग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे अवैध धंद्यातही या तंत्रज्ञानाचा व आधुनिक उपकरणांचा उपयोग करून गैरमार्गाने कोट्यवधीची माया जमविली जात आहे. शहरात ऑनलाईन मोबाईल सट्टा जोमात सुरू आहे. तिरोड्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर धाड घालून चार आरोपींना अटक केली आहे. तर ३० लाख ९ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २६ ऑक्टोबरच्या रात्री ९.४५ वाजता करण्यात आली.गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी तिरोडाच्या शास्त्री वॉर्डात सुरू असलेल्या ऑनलाईन मोबाईल सट्टा अड्ड्यावर धाड घातली. शास्त्री वॉर्डातील मनोहर तरारे यांनी आपल्या घरी घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावून, घराच्या समोरील दाराला बाहेरून कुलूप लावून वरच्या माळ्यावर ऑनलाईन मोबाईलवर सट्टा लावून जुगार खेळवित होता. या माहितीवरून पंचाच्या समक्ष २६ ऑक्टोबरच्या रात्री ९.४५ वाजता धाड टाकली. मनोहर तरारे यांच्या घराच्या पहिल्या माळ्यावरील एका खोलीत ऑनलाईन मोबाईलवर सट्टा सुरू होता. तेथे सट्ट्याचे आकडे लिहून जुगार खेळताना चार आरोपी मिळाले. आरोपींमध्ये मनोहर श्रीराम तरारे (४४) रा. शास्त्री वॉर्ड तिरोडा, सुरेश चमरु घोडमारे (४०) रा. संत कवरराम वॉर्ड तिरोडा, डेव्हिड रविकिरण बडगे (२७) रा. आंबेडकर वॉर्ड तिरोडा व संदीप चरणदास गजभिये (३८) रा.महात्मा फुले वॉर्ड तिरोडा यांचा समावेश आहे. या कारवाईत ६ लाख ५३ हजार ९०० रुपये रोख, १६ नग विविध कंपनीचे मोबाईल किंमत १ लाख ८१ हजार रुपये व इतर साहित्य असा ३० लाख ९ हजार ४१२ रुपयांचा माल जप्त केला आहे.