गोंदिया : जिल्ह्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून आजघडीला तिरोडा व सडक-अर्जुनी तालुका कोरोनामुक्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट असलेला तिरोडा तालुका मागील आठवडाभरापासून कोरोनामुक्त आहे. तालुकावासीयांच्या सहकार्याचेच हे फलित असून कोरोनामुक्त वातावरणात त्यांना श्वास घेता असून, त्यांची ‘बल्ले-बल्ले’च झाली आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. तेव्हापासूनच जिल्ह्यात गोंदिया तालुका प्रथम क्रमांकाचा तर तिरोडा तालुका दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट बनला आहे. यात आता दुसऱ्या लाटेने कहर केल्यानंतर जिल्ह्यातील परिस्थिती पुन्हा विस्कळीत झाली होती. आता दुसरी लाट ओसरत असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे, तिरोडा व सडक-अर्जुनी तालुका आजघडीला कोरोनामुक्त झाला आहे. यात, सडक-अर्जुनी तालुका मागील २-३ दिवसांपासून कोरोनामुक्त असला तरी तिरोडा तालुका मात्र ३० जूनपासूनच कोरोनामुक्त आहे.
विशेष म्हणजे, सडक-अर्जुनी तालुका सोबतच देवरी तालुकाही कोरोनामुक्त झाला होता. मात्र, तेथे पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्यांना कोरोनामुक्तीच्या यादीतून बाहेर व्हावे लागले होते. सध्या सडक-अर्जुनी तालुका पुन्हा एकदा कोरोनामुक्त झाला असतानाच देवरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, मागील ८ दिवसांपासून तिरोडा तालुका तालुकावासीयांनी कोरोनाला तालुक्यात शिरू दिले नसल्याने हीच बाब उल्लेखनीय आहे.
-----------------------------------
गोंदियापेक्षा सालेकसा तालुक्यात बाधित अधिक
गोंदिया तालुका जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा कोरोना हॉटस्पॉट आहे. कारण या तालुक्यातच बाधित व मृतांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, आजघडीला गोंदिया तालुक्यात जेथे फक्त ६ क्रियाशील रुग्ण आहेत. तेथेच सालेकसा तालुक्यात ११ क्रियाशील रग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, सालेकसा तालुका लसीकरणात सुद्धा माघारलेला दिसून येत होता. यामुळे सालेकसा तालुका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.