गोंदिया : वैयक्तिक सुरक्षिततेस धोक्यात आणणारी कृती करणेे, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, आपखुसीने दुखापत करणे, हल्ला करणे किंवा खंडणी वसूल करणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे, घरफोडी करणे असे गंभीर गुन्हे करून टोळीची दहशत राहावी म्हणून हत्यार जवळ बाळगून नागरिकांत दहशत माजविणाऱ्या अभिषेक ऊर्फ जादू प्रेमलाल वर्मा (वय १९, रा. रामचंद्र आईलमिल जवळ, श्रीनगर, गोंदिया), घनशाम ऊर्फ गोलू अशोक चौधरी (१९, रा. श्रीनगर, मालविय वॉर्ड, गोंदिया) व उदय ऊर्फ आवू उमेश उपाध्याय (१९, रा. मुर्री चौकी समोर, गोंदिया) या तीन आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी, पूर्वेतिहास लक्षात घेत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाढत्या संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील संघटीतरीत्या गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाईचे धोरण राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. गोंदिया शहर पोलिस ठाण्यात या आरोपींवर भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे. जिल्ह्यात त्यांची टोळी सक्रिय करून जनसामान्यांच्या मनात भय व हिंसेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांचा अंतिम हेतू स्वतःकरिता आर्थिक फायदा मिळविणे हा आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, शहरचे ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन म्हेत्रे यांच्या नियंत्रणाखाली, पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस हवालदार चेतन पटले व गोंदिया शहर येथील तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील, पोलिस हवालदार जागेश्वर उईके, दिनेश बिसेन व डी. बी. पथकाने केली आहे.
त्या टोळीवर १५ गुन्हेया टोळीने सन २०१९ पासून ते आजपर्यंत अनेक गुन्हे केले आहेत. या टोळीमुळे इतरांच्या जिवाला आणि वैयक्तिक सुरक्षिततेस धोका आहे. त्यांचे कृत्य हे समाजविघातक आहे. जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, आपखुसीने दुखापत करणे, हमला करणे किंवा खंडणी वसूल करणे, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी करणे, घरफोडी करणे असे गंभीर गुन्हे आहेत. टोळीची दहशत राहावी म्हणून हत्यार जवळ बाळगून नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या या टोळीवर १५ गुन्हे दाखल आहेत.लोकांकडून लुटलेल्या पैशांवर ते ऐश करतातया टोळीतील आरोपी गैरकृत्यांद्वारे मिळणाऱ्या पैशांवर ऐशोरामाचे आणि चैनीचे जीवन जगत आहेत. या आरोपींच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल माहिती घेऊन वेळीच दखल घेत पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला व गोंदिया शहर पोलिसांना संघटित टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश केले होते. यावरून पोलिस स्टेशन गोंदिया शहर व स्थानिक गुन्हे शाखा यांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत प्रस्ताव तयार केला. पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र कॅम्प नागपूर यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.