कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजघडीला बहुतांश व्यक्तींच्या तोंडात तंबाखू-गुटख्याचा बार भरलेला दिसतो. यामध्ये तरुण, युवा व वृद्धच काय तर १४ वर्षांच्या आत अल्पवयीनांचाही समावेश आहे. मात्र व्यनसाचा हा चस्का फक्त पुरुषांपुरताच मर्यादित नसून महिला सुद्धा यापासून काही दूर नाहीत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत मिळालेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. या विभागाने सन २०२४ मध्ये तंबाखूचे व्यसन करणाऱ्या तब्बल १५३९ महिलांचे समुपदेशन केले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकच व्यक्ती आपला ताण कमी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या व्यसनात अडकला आहे. यामध्ये कुणी संगीत ऐकतो, तर कुणी एकांतवासात राहतो, कुणी सिगारेट ओढून तर कुणी मद्यप्राशन करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कित्येकांना तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तोंडात तंबाखू-गुटखा भरून ठेवण्याची सवय जडून जाते. सुरुवातीला फक्त काही काळ आनंद देणारी ही सवय पुढे जाऊन व्यसनात परावर्तित होते व त्यानंतर त्या व्यक्तीला याशिवाय राहताच येत नाही. तंबाखू-गुटखा आदींचे व्यसन यातच मोडते.
तंबाखू-गुटखा खाणे हे फक्त पुरुषांनाच शोभते असे वाटते. मात्र असे नसून पुरुषांच्या पाठोपाठ महिलाही तंबाखू-गुटखाचा बोकणा तोंडात भरून राहतात असे तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील सन २०२४ मधील अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत तब्बल १५३९ महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना तंबाखू-गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
१४ वर्षापर्यंतची मुले-मुलीही शौकीन विभागाकडून तयार करण्यात आलेल्या गटांची पाहणी केली असता त्यात ० ते १४ वर्षापर्यंतच्या पुरुषांच्या गटात तब्बल ३२ मुले तंबाखू-गुटखा खाणारी आहेत. तर दोन मुलींचाही यामध्ये समावेश आहे. शिक्षण व खेळण्याच्या वयात त्यांना हे व्यसन जडणे म्हणजे ही बाब किती गंभीर आहे ही आकडेवारी दाखवून देत आहे.
३१३१ पुरुषांचेही केले समुपदेशनजिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून ३१३१ पुरुषांचेही समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये ही गट पाडण्यात आले आहेत. तंबाखू-गुटख्याचे व्यसन करणाऱ्यांत पुरुषांची संख्या जास्त आहे, यात शंका नाही. मात्र महिलांचाही यात समावेश ही बाब मात्र चिंतनीय आहे.
प्रत्येकच गटात महिलांचा समावेश राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाने तंबाखू-गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करीत असलेल्यांना वयोगटनिहाय विभागले आहे. यामध्ये ० ते १४, १५ ते ४९ व ५० वर्षाच्या वर असे ते अट असून आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येकच गटात महिला- मुलींचा समावेश आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १५३९ महिलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. वास्तविक अशा शौकीन महिलांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असणार यात शंका नाही.