लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन व आरोग्य प्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्त वतीने ‘तंबाखूमुक्त शाळा’ या विषयावर गोंदिया तालुक्याचे तालुकास्तरीय प्रशिक्षण नुकतेच पार पडले. गटशिक्षणाधिकारी जनार्दन राऊत यांच्या अध्यक्षतेत आयोजित या कार्यशाळेला सलाम मुंबईचे गोंदिया जिल्हा समन्वयक संदेश देवरुखकर व आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.सूर्यप्रकाश गभने प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी राऊत यांनी, सुधारित ९ निकषांप्रमाणे शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे लवकरच जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा घोषित करण्यात येईल, असे आवाहन केले. देवरूखकर यांनी, केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुधारित ९ निकष संदर्भात शाळा शासन परिपत्रकाप्रमाणे तंबाखूमुक्त कराव्यात, असे सांगितले, तसेच निकष कसे करावे व तंबाखूमुक्त शाळा ॲपवर कसे अपलोड करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.गभने यांनी, शाळा व मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी, निकष करताना येणाऱ्या अडचणींवर संस्थांची, आरोग्य विभागाची व कार्यकर्त्यांची कशी मदत घेता येईल, हे सांगितले. यलो लाइन संदर्भात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ.अनिल आटे यांच्याशी संपर्क करावा, असेही सुचविले. कार्यशाळेसाठी गट साधन केंद्राचे गटसमन्वयक व्ही.बी. परतेकी, साधनव्यक्ती रविशंकर पटले, केंद्रप्रमुख डी.बी.खोब्रागडे, के.एस.फुने, आरोग्य प्रबोधिनीच्या अर्चना गभने, आरती पुराम यांनी सहकार्य केले.
हे आहेत तंबाखूमुक्त शाळेचे निकषशैक्षणिक संस्थेच्या आवारात ६०-४५ सेंटिमीटर आकाराचा तंबाखूमुक्त परिसरचा फलक असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांकाचा उल्लेख असावा. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रवेशद्वाराच्या सीमेवर किंवा शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर ६०-४५ सेंटिमीटर आकाराचा फलक लावलेला असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, पदनाम, संपर्क क्रमांकाचा उल्लेख असावा. शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये. सिगारेट बिडीचे तुकडे, गुटखा तंबाखूचे पाउच, भिंतीवर त्याचे डाग इत्यादी असू नयेत. तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित साहित्य प्रदर्शन असावे. शैक्षणिक संस्थेत गेल्या ६ महिन्यांत तंबाखू नियंत्रणावर आधारित किमान १ उपक्रम राबविणे. शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू माॅनिटर म्हणून कर्मचाऱ्यांमधून अधिकारी, शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधी मधील नेमले पाहिजेत आणि संपर्क क्रमांक नमूद केले जावेत. तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही, हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचारसंहितेमध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे. शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून १०० यार्ड क्षेत्र रेखांकित केले गेले पाहिजे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्डात नसावे.