मनोहरभाई जयंती सोहळा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, फुटबॉलपटू येणार गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षणमहर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांचा १११ वा जयंती सोहळा गुरूवार दि.९ फेब्रुवारीला स्थानिक डी.बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे. यात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदकांनी गौरविण्यात येणार आहे. या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री खा.प्रफुल्ल राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय प्रवक्ता माजी खासदार के.सी.त्यागी, माजी खा.पवन वर्मा, भारतीय फुटबॉल टीमचे माजी कर्णधार बाईचुंग भुटीया, विद्यमान कर्णधार सुनील छेत्री, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अतिथी म्हणून आ.गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नानाभाऊ पंचबुद्धे, माजी आ.अनिल बावनकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवय वाघाये, वर्षा पटेल, मधुकर कुकडे, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी राहणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुजराती राष्ट्रीय केवलणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समितीचे अध्यक्ष माजी आ.हरिहरभाई पटेल तसेच मनोहरभाई पटेल अकादमी व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) मनोहरभाई पटेल यांचे शैक्षणिक योगदान स्व.मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची दारे उघडली आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे स्वत: फारसे शिक्षण घेऊ शकले नाही तरी त्यांनी या भागातील भावी पिढी शिक्षित व्हावी यासाठी दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा-महाविद्यालये सुरू केली. आजही या शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देश-विदेशात या शाळांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपली कामगिरी दाखवित आहेत. त्यांचा हा वसा पुढेही चालावा आणि दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेत अव्वल राहण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून खा.प्रफुल्ल पटेल यांनी मनोहरभाई पटेल यांच्या नावे विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा आज ‘सुवर्ण’ गौरव
By admin | Published: February 09, 2017 1:03 AM