निधी मिळालाच नाही : १००१ शौचालय वेटींगवर, १.६५ कोटींची मागणी कपिल केकत गोंदिया स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत राबविण्यात येत असलेला शौचालय बांधकामाचा कार्यक्रम आता अडचणीत आला आहे. कारण शौचालय बांधकामासाठी नगर परिषदेकडे निधी नसल्याने १००१ एक शौचालयांच्या कामांना ब्रेक लागला आहे. शिवाय शौचालयांचे बांधकाम सुरू असलेल्यांना त्यांचे अनुदान देण्यासाठीही पैसे नाहीत. नगर परिषदेने शासनाकडे यासाठी मागणी केली आहे. मात्र निधी नसल्याने लाभार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे. याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले. या योजनेंतर्गत नगर परिषदेला २७५१ शौचालयांचे बांधकाम करावयाचे असून १७५० शौचालयांचे बांधकाम सुरू करविण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असलेल्यांमधील संपूर्ण १७५० लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला असून १००० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. तर तिसरा हप्ता नगर परिषदेकडून दिला जाणार असून ४०० लाभार्थ्यांना तो देण्यात आला आहे. मात्र निधी नसल्याने ७५० लाभार्थ्यांचा तिसरा हप्ता अडकून पडला आहे. विशेष म्हणजे १००१ शौचालयांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. निधी नसल्याने नगर परिषदेकडून या लाभार्थ्यांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. शिवाय या लाभार्थ्यांना नगर परिषदेतून आल्या पावली परत जावे लागत आहे. अगोदरच काम सुरू असलेल्या ७५० लाभार्थ्यांना देण्यासाठी नगर परिषदेकडे पैसे नाहीत. त्यात आणखी १००१ शौचालयांचे बांधकाम सुरू करणे म्हणजे सध्यातरी अशक्य आहे. त्यामुळे शौचालय बांधकामाला ब्रेक लावण्यात आला आहे. शासनाकडून निधी येणे गरजेचे आहे. १४२ शौचालयांचे काम सुरू नाही एकीकडे निधीची कमतरता असल्याने शौचालयांचे बांधकाम रखडत चालले असून नवीन कामांना ब्रेक लागला आहे. तर दुसरीकडे मात्र १४२ लाभार्थ्यांनी हफ्ते उचलूनही शौचालयांचे काम सुरू केले नसल्याची माहिती आहे. यातील १३५ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता तर सात लाभार्थ्यांनी दुसरा हफ्ता उचलला आहे. विशेष म्हणजे काहींनी अनुदान मिळाले नसतानाही त्यांच्याकडील पैसे लावून शौचालय पूर्ण करवून घेतले आहेत. अशाप्रकारे ६८२ शौचालयांचे बांधकाम पूण झाले आहे. आणखी १.६५ कोटींची गरज आजघडीला नगर परिषदेला बांधकाम सुरू असलेल्या ७५० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता द्यावयाचा आहे. म्हणजेच त्यांना ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. शिवाय १००१ शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यासाठी एक कोटी २० लाख रूपये लागतील. म्हणजेच नगर परिषदेला आणखी एक कोटी ६५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. विशेष म्हणजे हा निधी शासकीय अनुदानासाठी खर्च होणार आहे. या व्यतिरीक्त नगर परिषदेला त्यांच्याकडील प्रत्येकी तीन हजार रूपयांचा निधी वेगळा द्यावा लागणार आहे.
शौचालय बांधकामाला ‘ब्रेक’
By admin | Published: August 01, 2016 12:02 AM