आमगाव : दुर्ग-इतवारी या लोकल गाडीतील महिला प्रवाशांच्या डब्यातील शौचालयाला कुलूप लावण्यात आले होते. यामुळे महिला प्रवाशांची कुचंबणा होत होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती ट्वीट करून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले व लावलेले कुलूप उघडण्याचे आदेश दिले.
प्राप्त माहितीनुसार १ जून रोजी दुर्ग-गोंदिया इतवारी प्रवासी रेल्वे गाडी सुरू झाली. या गाडीत महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात महिला बसल्या. काही अंतरावर गाडी गेल्यानंतर महिला प्रवासी शौचालयाकडे गेल्या असता शौचालयाच्या दरवाज्याला कुलूप लागले होते. त्यामुळे महिला प्रवाशांची अडचण झाली. रेल्वेत प्रवास करताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांमध्ये प्रवाशांना शौचालयाची सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली; परंतु लोकल गाडीतील शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूप लावल्याने अनेक प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक महिलांनी याबद्दल रोष व्यक्त करीत आपली व्यथा सांगितली. याची दखल घेत आमगाव येथील यशवंत मानकर या सामाजिक कार्यकर्त्याने दुर्ग-गोंदिया-इतवारी गाडीतील कुलूपबंद शौचालयाचा फोटो काढून तो रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना ट्वीट केला. तसेच या सर्व प्रकाराची तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्याचीच त्वरित दखल घेत रेल्वे विभागाने तक्रारकर्त्या सामाजिक कार्यकर्त्याशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच ट्विटरवरसुद्धा कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले. तसेच शौचालयाला लावलेले कुलूप उघडण्याचे निर्देश संबंधितांना दिले.