विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुका कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात अव्वल ठरला आहे. तालुक्यात ९२ टक्के लसीकरण झाले आहे. ९० टक्क्यांच्यावर लसीकरण होणारा पहिला तालुका आहे. तर १७ गावांत शंभर टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत ८४.४२ टक्के लसीकरण झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी अमित खोडणकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एक ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त प्रयत्नाने आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात अडचणींवर मात करीत लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात मोलमजुरी करणारा वर्ग अधिक आहे. अशावेळी त्यांना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावरून येणे किंवा बोलाविणे शक्य नसताना आपले आरोग्य कर्मचारी मजुरांच्या कामाच्या ठिकाणी कधी शेतीच्या बांधावर तर कधी वीटभट्टीवर, कधी मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी शिबिर लावून लोकांना लसीकरण केले. दरेकसा, बिजेपार परिसरात आरोग्य कर्मचारी, दुर्गम भागात असलेल्या गावांमध्ये पायी चालत जाऊन त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी लसीकरण केले.
अडचणीवर मात करीत गाठले उद्दिष्ट- तालुक्याची लोकसंख्या एकूण ९४५०६ असून एकूण ८६ महसूल गावे आहेत. त्यात १८ वर्षांवरील वयाच्या ६४९७४ नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ५९४७८ नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ३४४१३ लोकांना दुसरा डोस दिला आहे. आतापर्यंत ९१.५४ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांचे जवळपास सर्वांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत ५२५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर २८६ कर्मचाऱ्यांना दुसरा असे एकूण ८११ डोस दिला आहे. फ्रंटलाइ न वर्करमध्ये १६८४ पहिला डोस आणि ११९२ दुसरा डोस एकूण २८७६ डोस दिला आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील २९२५७ नागरिकांना पहिला डोस आणि १५०६८ नागरिकांना दुसरा डोस असे एकूण ४४४२६ डोस लावण्यात आले. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील १८७६० लोकांना पहिला आणि १२८३७ लोकांना दुसरा असे एकूण ३१५५० डोस पूर्ण झाले. ६० वर्ष व त्यापेक्षा वरील सर्व नागरिकांपैकी एकूण ९२५२ लोकांना पहिला व ५०३४ लोकांना दुसरा डोस असे १४१४५ डोस दिले आहे.तालुक्यातील १७ गावात १०० टक्के लसीकरण- तालुक्यात एकूण ८६ महसुली गावांतर्गत गाव आणि टोल्यांची संख्या एकूण १६७ एवढी आहे. यापैकी आतापर्यंत एकूण १७ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झालेले आहे. यात सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बंडटोला, दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेकाटोला, कोपालगड, दल्लाटोला, चांदसुरज, डुंबरटोला आणि बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत म्हसीटोला, केहरीटोला, लभानधारणी, गोंडीटोला, पांढरवाणी, बीजाकुटुंब, नवाटोला, सालईटोला, कलारटोला, पुरामटोला आणि भर्रीटोला आदी गावांचा समावेश आहे.
तालुक्यातील नागरिकांचे सहकार्य आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वीकारलेले आवाहन यामुळे सालेकसा तालुका कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात जिल्ह्यात सर्वात पुढे आहे. ज्यांनी पहिला डोस लावला, त्यांनी दुसरा डोस लावून घ्यावा. ज्याचे दोन्ही डोस झाले असतील, त्यांनी नियमित मास्कचा वापर करावा.-डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा