कपिल केकत गोंदियामागील वर्षभरापासून बंद पडून असलेल्या मोक्षधाम सौंदर्यीकरणाचा विषय पालिकेच्या १२ तारखेच्या आमसभेत चांगलाच गाजला. नगरसेवक राजकुमार कुथे यांनी हा विषय सभेत उचलून धरला व मोक्षधामचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली. यावर सभेत सर्वानुमते या विषयाला मंजूरी देण्यात आली. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ३० नोव्हेंबर रोजी ‘मोक्षधामचे सौंदर्यीकरण दिशाहिन’ ही बातमी प्रकाशित केली होती व त्याचीच दखल घेण्यात आल्याची माहिती आहे. दलितेत्तर योजनेतून येथील मोक्षधामात दोन नव्या शेडचे बांधकाम, पेवींग ब्लॉक लावणे, क्वार्टरची दुरूस्ती यासह सौंदर्यीकरणाचे काम करावयाचे आहे. सुमारे ५४ लाख रूपयांच्या निधीतून हे काम करावयाचे असल्याची माहिती असून यासाठी नगर परिषदेकडे पैसाही उपलब्ध आहे. संबंधीत कंत्राटदाराने मागील सप्टेंबर महिन्यात कामाला सुरूवात केली व मार्च पर्यंत हे काम सुरू होते. मात्र पुढील कामाबाबत नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराला निर्देश देण्यात आले नाही. परिणामी हे काम मागील आठ- नऊ महिन्यांपासून पडून आहे. पैसा पडून असतानाही काम सांगीतले जात नाही, यातून मात्र विभागाचा नियोजन शून्य कारभार पुढे येतो. कंत्राटदार काम करण्यासाठी तयार असताना त्यांना काम न सांगणे हा प्रकार मात्र आश्चर्यजनक आहे. काम अडकून पडल्याने खुद्द कंत्राटदाराने मुख्याधिकारी व विभागाकडे याबाबत कित्येकदा चर्चा केली. मात्र त्याचा काहीच फायदा निघाला नाही. यासाठी आता कनिष्ठ अभियंता, पालिका अभियंता, मुख्याधिकारी, पदाधिकारी कुणाला दोषी ठरवायचे हा प्रश्न पडतो. हा प्रकार ‘लोकमत’ने ३० नोव्हेंबर रोजी बातमीच्या माध्यमातून पुढे आणला. तर पालिका अभियंता भावे यांनी लवकरच मोक्षधामची पाहणी करून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पालिका प्रशासनाकडून काहीच झाले नाही. शेवटी हा विषय १२ तारखेला झालेल्या आमसभेत नगरसेवक राजकुमार कुथे यांनी उचलून धरला. शहरवासीयांना काही चांगली वस्तू मिळणार ही अपेक्षा होती. मात्र तीही हिरावल्याने कुथे यांनी आमसभेत मोक्षधाम सौंदर्यीकरणासाठी लागेल तेथून निधी उपलब्ध करवून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची मागणी केली. तसेच मोक्षधामाच्या मागे असलेल्या नाल्याचे परिसरही दुरूस्त करण्याची मागणी केली. या महत्वपूर्ण विषयावर सभेला उपस्थित अन्य सदस्यांनीही गांभीर्याने घेत मंजुरी दिली.
मोक्षधाम सौंदर्यीकरणाचा विषय गाजला
By admin | Published: January 18, 2016 2:01 AM