७६८ जणांना अटक : ८४ लाखांचा मुद्देमाल जप्त गोंदिया : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हातभट्टीची दारू गाळण्याचे प्रमाण जास्त आहे. दारू गाळण्यासाठी उपलब्ध असणारे मोहफूल आणि अनुकूल भौगोलिक क्षेत्र हे त्यामागील प्रमुख कारण आहे. मात्र या अवैध दारूभट्ट्या आणि गाळलेली दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अल्प मनुष्यबळातही सातत्याने कारवाई करीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत १०७० गुन्हे दाखल केले आहेत. वर्षभरातील कारवाईत ७५० जणांना दारू गाळताना आणि विकताना रंगेहात पकडण्यात आले. मात्र ३२० बेवारस दारूभट्ट्या आढळल्या. या कारवायांमध्ये ७६८ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून हातभट्टीची दारू, मोहा सडवा व इतर साहित्य मिळून एकूण ८४ लाख १९ हजार ७१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनात एप्रिल ते मार्च २०१७ दरम्यान नियमित कारवायांसोबत फ्लाईंग स्कॉडच्या माध्यमातून विशेष मोहीमा राबविण्यात आल्या. विशिष्ट सण, उत्सवाच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ‘ड्राय डे’ पाळला जातो. या वेळीही अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढते. त्या सर्व अवैध विक्रेत्यांवर कारवाई केल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रमाणात गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते. यात गोंदियाचे प्र.निरीक्षक बाळू भगत, दु.निरीक्षक निकुंभ, देवरी प्र.निरीक्षक एम.पी. चिटमटवार, दु.निरीक्षक एस.एल. बोडेवार, स.दु.निरीक्षक सी.आय. हुमे, रहांगडाले व इतर कर्मचाऱ्यांंनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला. आता गोंदियाला निरीक्षक म्हणून सेंगर रुजू झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) अपुऱ्या मनुष्यबळामुळे एक्साईज विभागावर ताण गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे त्या राज्यांमधील कमी दर्जाची दारू आणून ती ब्रँडेड विदेशी कंपन्यांच्या बॉटल्समध्ये भरून विक्री करण्याचा प्रकारही गोंदियात अधूनमधून उघडकीस येतो. त्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सीमा तपासणी नाकेही आहेत. मात्र या विभागाकडे गेल्या अनेक वर्षांपासून अपुरे मनुष्यबळ आहे. गेल्या वर्षभरात गोंदिया आणि देवरी येथील निरीक्षकांच्या जागा रिक्त होत्या. याशिवाय इतर कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्याही जागा रिक्त आहेत. गोंदिया येथील अधीक्षकांच्या कार्यालयात २ लिपिक, १ वरिष्ठ लिपिक, १ स्टेनो ही पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीतही या विभागाने कारवायांमध्ये सातत्य ठेवले आहे.
हातभट्टीच्या दारूचे वर्षभरात १०७० गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 12:55 AM