सालेकसा : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सालेकसा तालुक्यातील हॉजरा फॉल्स पुन्हा पर्यटकांना आकर्षित करीत असून या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. हाजरा फॉल्स सुरू झाल्याने पर्यटकही आनंदीत असल्याचे दिसून येत असून पर्यटकांना सेवा देणारे युवक सुद्धा सज्ज झाले आहेत.
तालुक्याची विशेष ओळख करून देणारा हाजरा फॉल्स सर्वदूर प्रसिद्ध असून तिन्ही राज्यांच्या सीमेलगत पर्वतरांगेच्या कुशीत असून पावसाळ्यात धबधब्यातून खाली पडणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढताच तिन्ही राज्यांचे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. परंतु कोविड-१९ च्या संसर्गामुळे पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे हाजरा फाॅल्सचे प्रवेशद्वार सुद्धा कुलूपबंद झाले होते. परंतु आता सर्वत्र पर्यटनस्थळे सुरू झाली असून हाजरा फाॅल्स सुद्धा सुरू झाला आहे.
स्वातंत्र्यदिनी रविवारी दूरवरून पर्यटकांनी येथे हजेरी लावून मनमोकळे होऊन धबधब्यासह परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटला. दिवसभरात एकूण ४१६० पर्यटकांनी हाजरा फॉल्सला हजेरी लावली. यामुळे देखरेख करणाऱ्या वन व्यवस्थापन समितीला एक लाख ३८ हजार ८१० रुपयांचे उत्पन्न मिळाले.
बऱ्याच दिवसांपासून हाजरा फॉल्स बंद असल्याने सेवा देणाऱ्या युवक-युवतींवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र त्यांना आता थोडा दिलासा मिळत असताना दिसत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोला यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या हाजरा फॉल्स परिसरात स्थानिक बेरोजगार युवक-युवतींनाच विविध इव्हेंट संचालित करण्यासाठी काम दिले जाते. या लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात. सोबतच रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडावेळ काढून मनाला प्रफुल्लित करण्यासाठी लोकही या स्थळाला प्रथमपसंती देतात. अशात हाजरा फाॅल्स पर्यटनस्थळ सुरू राहिल्यास सर्वांसाठी लाभप्रद ठरते.